ना.रक्षाताई खडसे यांनी घेतला महत्त्वाकांक्षी प्रकल्प “मेगा रिचार्ज” योजने संबंधी आढावा…
जळगाव दि.१६ जुन २०२४ : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी जळगाव जिल्ह्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना (मेगा रिचार्ज) संबंधी तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिकाऱ्यांची कोथळी (मुक्ताईनगर) येथील निवासस्थानी बैठक घेऊन आढावा घेतला.
यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना चा रु.19244/- कोटी किमतीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला असून राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांच्या सहमतीसाठी शासनास सादर आहे. सदर योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील जळगाव, बुलढाणा, अकोला अमरावती या जिल्ह्यातील 213706 हेक्टर क्षेत्रास तसेच मध्यप्रदेश राज्यातील खंडवा, बऱ्हाणपूर या जिल्ह्यातील 96082 हेक्टर क्षेत्रात पाणी पुनर्भरण होऊन भूजल पातळी वाढीमुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होणार आहे.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांच्या पुढाकाराने केंद्र शासन स्तरावर जलशक्ती मंत्रालय केंद्र सरकार दिल्ली येथे लवकरच बैठक आयोजित करण्यात येऊन योजनेच्या मंजुरीसाठी महाकाय पुनर्भरण योजनेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र शासन, मध्य प्रदेश शासन, केंद्र सरकार मधील संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीस तापी पाटबंधारे विकास महामंडळ तर्फे कार्यकारी अभियंता .दाभाडे व उपविभागीय अभियंता के.पी.पाटील उपस्थित होते.