जळगाव दि.२४ जुन २०२४ : जळगावात दरवर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १० एप्रिल २०२५ रोजी येणाऱ्या भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवातसुद्धा विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांच्या प्रेरणेने ओतप्रोत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम सुत्रबद्ध नियोजनासाठी सकल जैन श्री संघ यांच्या अधिनस्थ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे गठन केले जाते. त्यासंबंधित येणाऱ्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव-२०२५ च्या अध्यक्षपदी तेरापंथ महासभेचे ज्येष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष राजकुमार सेठीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
विविध धार्मिक कार्यात, जैन मुनींच्या सेवेत व सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये राजकुमार सेठीया सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांचे संघटन आणि व्यवस्थापन कौशल्य विशेषत्वाने लक्षात घेऊन त्यांना या महत्त्वाकांक्षी महोत्सव समितीचे अध्यक्षपद सर्वानुमते प्रदान करण्यात आले. दि.२३ ला स्वाध्याय भवन येथे झालेल्या सभेत ही निवड केली गेली. या सभेला सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनताराजी बाफना, ताराबाई डाकलिया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, अजय ललवाणी, विजयराज कोटेचा, स्वरुप लुंकड, सुशील बाफना, पारस राका, अजय राखेचा, अनिल कोठारी, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी महेंद्र जैन यांनी हिशोबाचा लेखाजोखा उपस्थित बांधवांसमोर मांडला.
राजकूमार सेठिया यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आगामी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव -२०२५ च्या तयारीसाठी बराच कालावधी मिळाल्याने तयारीसाठी उपयुक्त वेळ मिळालेला आहे मी सकल श्री जैन संघाचे आभार मानतो. तसेच यावर्षी महोत्सव साजरा करण्यासोबतच २६२४ उपवास करण्याचे सर्वांना आवाहन करत आध्यात्मिकतेची जोड देण्याची साद राजकुमार सेठिया यांनी समाजबांधवांना घातली. सभेचे समन्वय संचालन अनिल कोठारी यांनी केले. या सभेत समाजबांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. आभार स्वरूप लुकंड यांनी मानले.