शिवचरित्राच्या रत्नजडीत कोंदणातील लोकशाहीच विश्वाला आदर्शभूत : संमेलनाध्यक्ष विजयराव देशमुख
पहिल्या अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनास नूतन मराठा महाविद्यालयात प्रारंभ
| लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.२७ जुन २०२४ :
छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तववादी चरित्र जगासमोर यावे. शिवरायांबाबत कोणी काहीही म्हणो, पण त्रिवार सत्य हेच आहे की, राष्ट्रीय संदर्भात शिवचरित्राच्या रत्नजडीत कोंदणातील लोकशाहीच विश्वाला आदर्शभूत ठरणार आहे. त्यासाठी आधी राष्ट्रीय व नंतर वैश्विक स्तरावर शिवचरित्र जागृती करण्यासाठी प्रत्येक देशभक्ताने कटिबध्द होणे ही काळाची गरज आहे. ‘शिवराजास आठवावे, जीवित तृणवत् मानावे’ या श्रध्देतून या पहिल्या अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनाचा हा संदेश सर्वदूर पोहोचवावा, अशी अपेक्षा शककर्ते शिवराय या ग्रंथाचे लेखक व अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांनी व्यक्त केली.
येथील नूतन मराठा महाविद्यालयात इतिहास प्रबोधन संस्था, महाराष्ट्र व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या सहकार्याने पहिल्या अखिल भारतीय श्रीशिवचरित्र साहित्य संमेलनास गुरुवार, २७ जून रोजी सुरुवात झाली. त्यावेळीस संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विजयराव देशमुख बोलत होते.
तंजावर येथील श्रीमंत शिवाजी राजे भोसले यांच्या हस्ते सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर निमंत्रक प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख, स्वागताध्यक्ष आमदार सुरेश भोळे (राजू मामा),
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा पोलस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, कार्याध्यक्ष डॉ. केतकी पाटील, १८ महाराष्ट्र बटालीयन एन.सी.सी.चे कर्नल पवनकुमार, स्वागत सचिव किरण बच्छाव, इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्त रवींद्र पाटील, सचीव भारती साठे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक योगेश भोईटे, तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज सुभेदार कृणाल मालुसरे, हंबीरराव मोहिते यांचे १४ वे वंशज विशाल मोहिते, दत्ताजी शिर्कें, सरदार जानोजीराव नाईक बावनेे यांचे ५२ वे वंशज माणिकराव नाईक बावने, सरदार जगदाळे यांचे प्रतिनीधी रविंद्र जगदाळे, नेताजी पालकर यांचे वंशज विक्रम पालकर हे उपस्थित होते.
आजपासून दोन दिवसात विविध २० सत्रांतून शिवरायांच्या चरित्राचा जागर होणार आहे.