जळगावसामाजिक

प्रचंड भीती, ताणतणावातून टोकाचा विचार करताय ? थांबा,डॉक्टरांना एकदा भेटा..!

शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञांनी दिली माहिती

लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.२९ जुन २०२४ | अनेकदा आपल्या आयुष्यात भयंकर अनपेक्षित प्रसंग येतात. ताण वाढतो. कधी आपला अपमान होतो, कधी कुणी कमी लेखतं, कधी आर्थिक अडचणी, कधी प्रेमभंग, कधी कुणी छळतं, सातत्याने प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे समोर वाटच दिसत नाही. अशावेळी निराश होणं, स्वतःवरचा ताबा सुटणं साहजिकच असतं. पण, स्वतःला सावरून पुन्हा उभं राहण्याची गरज असते. अशा वेळी आपल्या जवळच्या व्यक्तीला याबाबत माहिती देऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार करा.नाहीतर एकदा तर मनोविकार तज्ज्ञांना भेटाच, असा सल्ला मनोविकार तज्ज्ञ डॉ. यश महाजन यांनी दिला आहे.

जीव नको झालाय, जीव द्यावा असे वाटणे, सतत निराश वाटणे, मनात आत्महत्येसारखे विचार येत असल्यास खचून न जाता आपल्या मनाची स्थिती आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा, त्यावर उपाय शोधा, असेही त्यांनी सांगितले. मागील ६ महिन्यांत जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनांत वाढ झाली आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्या, तरुणांच्या आत्महत्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नैराश्य आल्यास, उदास, नाराज वाटत असेल तर जवळील व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला, असेही डॉ. महाजन म्हणाले.

आपल्या मनानुसार सर्व गोष्टी घडतील असे नाही. बरेचदा समजुतीने घ्यावे लागते. आलेली कठीण परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते. ती तात्पुरती असते. नेहमी तशीच स्थिती राहील असे नाही. त्यामुळे धीर सोडू नये, संयम बाळगावा, कठीण परिस्थितीत चांगल्यात चांगलं काय करता येईल ते पहा. ‘टेन्शन’ आल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मनोविकार विभागात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले आहे 

आत्महत्येची कारणे
● बेरोजगारी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. व्यवसायासाठी भांडवल मिळत नाही. खिशात खर्चायला देखील पैसे राहत नाही. त्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण होत असून, ते टोकाचा निर्णय घेत आहेत.
● नापिकी, कर्जबाजारीपणा : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
● तणाव : विविध कारणातून वाढलेला तणाव आत्महत्येचे मोठे कारण दिसून येत आहे. मात्र, याला आत्महत्या हा पर्याय नाही. समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर मार्ग निघत असतो.

ताणतणावाच्या टिप्स
● छंद जोपासा : नकारात्मक विचार येत असतील तर चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे.आपल्या आवडीचे छंद जोपासावेत.
● मित्रांसोबत वेळ घालवा : चांगल्या मित्रांसोबत वेळ घालविल्याने एकाकीपणा कमी होतो. त्यामुळे जास्त एकटे राहणे टाळा.
● सकारात्मक विचार : आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करायला हवा. सकारात्मक विचारामुळे ऊर्जा निर्माण होते आणि मन प्रसन्न राहते.
● पौष्टिक आहार घ्या : पौष्टिक आहार घ्यावा. नियमित व्यायाम किंवा योगा केल्यास मन प्रसन्न राहते.
● संवाद साधा : आत्महत्येसारखे विचार मनात येत असल्यास आपल्या जवळील व्यक्तींशी संवाद साधा, मन हलके करा.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button