नीट यूजी, पीजी आणि सुपर स्पेशालिटी परीक्षांमधील घोटाळे विरोधात डॉक्टरांचा निषेध मोर्चा
लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.३० जुन २०२४ |
नुकत्याच घडलेल्या आणि अजूनही सुरु असलेल्या नीट युजी परीक्षा घोटाळा आणि नीट पिजी परीक्षा शेवटच्या क्षणी पुढे ढकलल्याच्या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने, संपूर्ण वैद्यकीय शिक्षण हा एक चेष्टेचा मुद्दा बनविला आहे.
या एजन्सींची विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व खोलवर ढासळले आहे. समाजाला या समस्येची जाणीव करून देण्यासाठी जळगांव आय एम ए , तर्फे पारदर्शक वैद्यकीय शिक्षण या विषयासह डॉक्टर्स डे निमित्त निषेध मोर्चा काढण्यात आला..
आयएमए डॉक्टर सदस्य वैद्यकीय व्यवसायातील सर्वात मोठे भागधारक आहोत आणि त्यामुळे भावी डॉक्टरांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाच्या टप्प्यांवरील परीक्षांत शासकीय घोटाळे आमच्यासाठी खरोखर स्वागतार्ह बाब नाही. आजचे डॉक्टर बनण्यास ईच्छुक विद्यार्थी हेच उद्याचे आयएमएचे सदस्य , शासकीय वैद्यकीय अधिकारी वा वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व अधिव्याख्याता होणार आहेत. समाजाचे स्वास्थ यांच्याच कौशल्यपूर्ण उपचारावर अवलंबून असणार आहे.
समाजाला या समस्येची जाणीव करून देण्यासाठी, आपण पारदर्शक वैद्यकीय शिक्षण” या विषयासह डॉक्टर्स डे निमित्त निषेध मोर्चा काढला असे डॉ. सुनिल गजरे,अध्यक्ष डॉ. अनिता भोळे सचिव यांनी सांगितले.
रविवार दिनांक ३० जून २०२४ रोजी सकाळी ७ वाजता काव्य रत्नावली चौक ते स्वातंत्र्य चौक असा निषेध मोर्चा आयोजित केला गेला. या निषेध मोर्चात आयएमए सदस्य डॉक्टर्स व उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले.