लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.४ जुलै२०२४ |
जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलनाची मोहीमेच्या दुसऱ्या दिवशी
गुरूवार ४ जुलै रोजी फळ गल्ली, मसाला गल्ली, छत्रपती शिवाजी नगर, गांधी मार्केट परिसरात कारवाई केली. या कारवाईत अतिक्रमण धारक व मनपाचे कर्मचारी यांच्यात वादावादी झाली. अतिक्रमण काढण्यात येत असल्याने एका अतिक्रमण धारकाने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत थेट मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पंरतु वेळीच या अतिक्रमण धारकास इतरांनी आवरल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
महापालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुख म्हणून अतुल पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विविध भागातील अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहिम राबविणे सुरू केले आहे.
राजकीय दबाब झुगारून कारवाई
दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे सुरू असलेल्या धडक कारवाईच्या वेळी राजकीय नेत्यांकडून अतिक्रमण विभाग प्रमुखांवर दबाव टाकून कारवाईस अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यासाठी हा दबाव झुकारून कारवाई केली जात आहे.
13 लोटगाड्या जप्त
गुरूवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने फळ गल्ली, मसाला गल्ली, छत्रपती शिवाजी नगर, महात्मा गांधी मार्केट परिसरात मोहिम राबविली. यात 13 लोटगाड्या जप्त केल्यात.
यांचा होता कारवाईत सहभाग
या कारवाईत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख अतुल पाटील, अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर,
सतीश ठाकरे, ज्ञानेश्वर कोळी,संजय पाटील, साजिद अली, नितीन भालेराव, भानुदास ठाकरे, कैलास सोनवणे, हिरामण बाविस्कर,दीपक कोळी, सलमान भिस्ती, इकबाल शेख, नाना सोनवणे,नितीन भालेराव या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.
कारवाई होणार तिव्र
अतिक्रमण धारकाने कर्मचाऱ्यांना केलेल्या धक्काबुक्कीनंतर अतिक्रमण हटाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
पोलीस संरक्षण न घेताच कारवाई
अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज केलेल्या कारवाईसाठी पोलीस संरक्षण घेतले नव्हते. त्यामुळे मुजोर अतिक्रमण धारकांनी कर्मचाऱ्यांसोबत वादावादी करून त्यांना धक्काबुक्की केली. एवढ्यावर तो अतिक्रमण धारक न थांबता त्याने कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी कोणत्यातरी वस्तूचा शोध घेण्यासाठी इतरत्र धावत असताना त्यास इतर विक्रेत्यांनी आवरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
माफी मागितल्याने प्रकरण मिटवले
अतिक्रमण काढताना एका अतिक्रमण धारकाने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. नंतर मात्र त्याने माफी मागितल्याने हे प्रकरण मिटवले. नियमानुसार त्याच्यावर जप्तीसह दंडात्मक कारवाई केली आहे.असे अतिक्रमण विभाग प्रमुख अतुल पाटील, यांनी संगितले.