जळगावसामाजिक

विद्यार्थ्यांनी भरकटत न जाता ध्येयाचा पाठलाग करावा

वैश्यवाणी समाजातील गुणवंतांचा सन्मान सोहळ्यात मान्यवरांचे मार्गदर्शन

लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.७ जुलै२०२४ |

सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग असून दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत असतो. १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झाल्यावर भविष्याचा कल ओळखून आणि आपल्याला असलेली आवड लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी पुढील वाट निवडणे आवश्यक आहे. इतरांकडे बघून भरकटत न जाता विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन ध्येयाचा पाठलाग करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला.

वैश्यवाणी युवा फाऊंडेशनतर्फे रविवार दि.७ जुलै रोजी बळीराम पेठेतील ब्राह्मण समाज हॉलमध्ये आयोजित वैश्यवाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर माजी जि.प.प्रशासन अधिकारी संतोष शेटे, माजी सैनिक शिवदास शेटे, उद्योजक निंबा वाणी, हिरालाल वाणी, अशोक शेटे, आदर्श शिक्षक उमेश बाविस्कर, मधुकर देसले आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना वैश्यवाणी युवा फाऊंडेशनचे प्रमुख चेतन वाणी यांनी, बऱ्याच वर्षापासून जळगावात गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला नसल्याने यंदा सर्वोत्तम सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळावी आणि इतरांना करिअरच्या वाटा शोधता याव्या म्हणून हा सोहळा घेण्यात येत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन आणि मार्गदर्शन करताना राकेश वाणी यांनी, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील शैक्षणिक वाट निवडताना असलेल्या संधी, समाजाकडून भविष्यात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वैश्यवाणी युवा फाऊंडेशनतर्फे आगामी काळात राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, समाजाचे संकेतस्थळ सुरू केले जाणार असल्याचे सांगितले.

आदर्श शिक्षक उमेश बाविस्कर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान असा भेद न करता प्रत्येक क्षेत्रात असलेल्या सर्व घटकांची विस्ताराने माहिती घेऊन त्यातच स्वतःला झोकून द्यावे. कोणतेही क्षेत्र असो त्यात मन लावून आणि संपूर्ण कष्ट घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. पालकांनी देखील विद्यार्थ्यांना एखाद्या विभागाला प्रवेश घेण्यासाठी दबाव न आणता पाल्याचा कल ओळखून त्यात करिअर करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. माजी सैनिक शिवदास शेटे यांनी मार्गदर्शन केले तर जतीन वळंजुवाणी, प्रणाली शेटे, सृजल शेटे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन भूषण वाणी यांनी केले.

गुणगौरव सोहळ्याची संकल्पना वैश्यवाणी युवा फाऊंडेशनचे चेतन वाणी, भुषण वाणी, राकेश वाणी यांची होती. सोहळ्यासाठी नियोजन समितीचे योगेश शेटे, पुरुषोत्तम शेटे, संजय शेटे, योगेश शेटे, राकेश शेटे, अशोक शेटे, राहुल शेटे, शशांक आहिरे, ज्ञानेश्वर शेटे, कैलास जाधव, मुकेश जाधव, पंकज शेटे यांच्यासह ब्राह्मण सभागृहाचे अभिमान तायडे, जकी अहमद इतर पदाधिकारी, समाजबांधव यांनी परिश्रम घेतले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, फोल्डर फाईल देऊन गौरविण्यात आले. समारंभाला राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आ.सुरेश भोळे आणि जैन इरिगेशनचे अशोक जैन यांचे सहकार्य लाभले.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button