जळगावकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य ; 350 व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त आयोजन
18 ते 20 फेब्रुवारी हे तीन दिवस पोलीस कवायत मैदानात होणार महानाटय
जळगाव दि.15: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन 18 ते 20 फेब्रुवारी या सलग तीन दिवसात पोलीस कवायत मैदानात होणार आहे. त्यासाठी विनाशुल्क पासची व्यवस्था केली असून ती जिल्ह्याच्या विविध शासकीय कार्यालयात उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
“जाणता राजा” महानाट्याचे आयोजन सायंकाळी 7.00 ते 10.00 या वेळेत करण्यात येणार आहे. या महानाटयाकरीता नागरिकांना प्रवेशासाठी निमंत्रण पत्रिका या विनाशुल्क स्वरुपात संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद/नगरपंचायत व जिल्हयाच्या ठिकाणी तहसील कार्यालय, महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतु शाखा येथे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी “जाणता राजा’ या महानाटयाचे प्रवेशासाठी निमंत्रण पत्रिका या ठिकाणाहून प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.