आगामी सण,उत्सव,मिरवणुकीत डिजेचा अतिरेक नको : जिल्हाधिकारी
सण उत्सव साजरे करतांना नियमांचे पालन करीत समाजात एकोपा रहावा : पोलिस अधीक्षक
जळगाव दि.८ : विविध सण उत्सव साजरे करतांना तसेच मिरवणूका, नंतर दुसऱ्या दिवशीच त्यासंबंधीचे बॅनर फलक काढले गेले पाहिजेत.मिरवणुकी दरम्यान शक्यतो डिजेचा वापर कमी केला पाहिजे,असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले तसेच. नागरिकांनी सण- उत्सव हे गाव-शहरात उत्साहात साजरे करावेत. ते साजरे करताना त्यात सर्वचत्र महिला, दिव्यांग, आणि ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग कसा वाढेल यावर भर दिला गेला पाहिजे,अशी संकल्पना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडली. सोमवार ८ रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे मंगलम हॉल येथे गुडीपाडवा, रमजान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम जयंतीच्या पार्श्वभुमिवर जिल्हास्तरीय शांतता कमेटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते व्यासपीठावर पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळचे अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीअंकीत , मनपाचे उपायुक्त गणेश चाटे तसेच जिल्हाभारतील शांतता कमेटीचे सदस्य, पोलीस पाटील, प्रभारी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. त्यानंतर शांतता कमेटीच्या सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पोलीस अधीक्षक यांनी पहिल्यांदाच जिल्हास्तरावर बैठकीचे आयोजन केले,याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी करीम सालार, ॲड. व्ही.एस. भोलाणे, भालेराव, मुकुंद सपकाळे, अनिल अडकमोल, रमेश मकासरे, पी.जे.पाटील, प्रविण ब्रम्हे, गोपाळराव सोनवणे, रवींद्र पाटील, सलीम इनामदार, निवेदिता ताठे यांनी मनोगत व्यक्त केले.
अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की मिरवणुकीत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला पाहिजे तसेच ज्या ठिकाणी महिलांचा जास्त सहभाग असतो, ते कार्यक्रम मिरवणूक शिस्तीत शांततेत व वेळेवर साजरे होतात. मिरवणुकीत सहभागी मुलांवर आयोजकांनी अधिक लक्ष दिले पाहिजे. यासाठी मुलांना मोठ्यांनी तसेच कमेटीच्या सदस्यांनी मार्गदर्शन करावे. आचारसंहितेचे पालन करुन हे सण जयंती उत्सव साजरे केले जावेत, असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी केले.मिरवणुकीत वेळेचे पालन करण्याचे आवाहन
जयंती मिरवणुकीचे जे मार्ग ठरले आहेत, त्यात कुठलाही बदल होणार नाही. त्यामुळे कोणीही पर्याय समोर करु नये. मिरवणुकीसाठी दिलेल्या वेळेचे पालन करावे आणि याची जाणीव लोकांना आयोजकांनी तसेच शातंता कमेटीच्या सदस्यांनी करुन द्यावी. लोकांना समजविणे, उत्सव शांततेत साजरे करणे याची मोठी जबाबदारी शांतता कमेटी सदस्यांवर असते,आणि त्यांनी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे. पोलीस कारवाईत व्देष राहत नसतो, हेही लक्षात घ्यायला हवे. यामागे उद्देश एकच असतो. समाजात शांतता राहावी.सदस्यांच्या चर्चेतून शांततेत मार्ग काढू, मात्र बाधा आणणाऱ्यांवर कारवाई करु. यात तरुण अडकला तर त्याचे भविष्य खराब होते, हे तरुणांना कळले पाहिजे, याचे काय परिणाम होतात हे शांतता कमिटीच्या सदस्यांनी या तरुणांना समजावून सांगावे. एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होवून प्रेमभावना वाढविण्याची सकारात्मकता रुजवायला हवी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यावेळी केले.
सण -उत्सवात डिजेचा अतिरेक नको: जिल्हाधिकारी
सण -उत्साहाने साजरे करा. कारण ते गाव, समाजाला एकत्र करतात. मात्र ते साजरे करताना दुसऱ्याला दाखविण्याचा देखावा नसावा. त्यात जबरदस्तीही नसावी. कोणाच्या घरासमोर डिजे वाजवू नका. शांतता सलोख्याचा भंग होणार नाही, याची खबरदारी शांतता कमेटीच्या सदस्यांनी घ्यायला हवी. यासाठी त्यांनी त्या त्या सण उत्सवात सहभाग घेतला पाहिजे. वेळेचे, नियमांचे पालन होईल, याकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. बॅनर, फलक, झेंडा लावताना प्रशासकीय परवानगी घ्यावी. विविध रंगाचे झेंडे एकत्रित लावून एकोप्याचे दर्शन घडवावे. डी.जे.च्या कर्कश आवाजाने अप्रिय घटना घडल्यास संबधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, जळगावात तीव्र उन्हाळा आहे, याची जाणीव तसेच भान ठेवून सण उत्सव साजरे करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.