जळगांव जिल्हाऔद्योगिकशैक्षणिक

विकसित भारत 2047’ शिक्षण, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम – ना.संजय सावकारे

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – वाणिज्य, व्यवस्थापन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून देशाला ‘विकसित भारत 2047’ या ध्येयाकडे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दोन दिवसीय तृतीय आंतरराष्ट्रीय म्हणजे बहुविद्याशाखीय परिषदेचा जळगाव येथे उत्साहात शुभारंभ झाला. कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन, मुंबई आणि युनिव्हर्सिटीज कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन, गुजरात यांच्या सहकार्याने लोकसेवक मधुकरराव चौधरी सामाजकार्य महाविद्यालय व शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘कॉमर्स, मॅनेजमेंट अँड इनोव्हेशन: रोडमॅप टू विकसित भारत 2047’ हा या परिषदेचा मुख्य विषय आहे.

 

उद्घाटन समारंभ आज सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मौखिक स्वागताने झाली. त्यानंतर प्राचार्य तथा परिषद संयोजक प्रा. राकेश चौधरी यांनी स्वागतपर भाषण करत उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आजच्या जागतिकीकरणाच्या युगात शिक्षण क्षेत्राला उद्योग आणि संशोधनाशी जोडणे अत्यंत गरजेचे आहे. या परिषदेच्या माध्यमातून नव्या कल्पना, संशोधन आणि उद्योगाभिमुख शिक्षणाला चालना मिळेल.”

यानंतर भारतीय वाणिज्य संघटनेचे खजिनदार डॉ. कुलदीप शर्मा यांनी सचिवीय अहवाल सादर केला. त्यांनी परिषदेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि देश-विदेशातील संशोधकांचा सहभाग याबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे, कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, उद्योगपती अशोकभाऊ जैन, परिषद अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, डॉ. बाबनराव तायवाडे, की-नोट वक्ते तानसेन चौधरी, डॉ. आशिष दवे आणि डॉ. कुलदीप शर्मा यांचा सन्मान करण्यात आला.

यानंतर परिषदेच्या ‘प्रोसीडिंग’ पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. विविध संशोधकांच्या निबंधांचा समावेश असलेले हे पुस्तक शैक्षणिक क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

या नंतर मान्यवरांनी आपले मार्गदर्शनपर विचार मांडले.

डॉ. बाबनराव तायवाडे यांनी शिक्षण आणि उद्योग यांच्यातील समन्वय वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण स्वीकारण्याचे आवाहन केले.

डॉ. आशिष दवे यांनी व्यवस्थापन शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्याची आवश्यकता यावर प्रकाश टाकला.

अशोकभाऊ जैन यांनी उद्योग क्षेत्रातील नवकल्पनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती कशी वाढविता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

मा. संजय सावकारे यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा आढावा घेत युवकांनी संधींचा लाभ घ्यावा असे सांगितले.

प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण संशोधनाची गरज अधोरेखित केली.

की-नोट अ‍ॅड्रेसमध्ये तानसेन चौधरी यांनी ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेचा सखोल ऊहापोह करत उद्योग, शिक्षण आणि संशोधन यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला.

डॉ. जोशी यांनी भाषणात नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी नवकल्पनांवर भर देण्याची गरज व्यक्त केली.

यानंतर परिषद अध्यक्ष शिरीषदादा चौधरी यांनी शिक्षणसंस्थांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.

या परिषदेचे विशेष म्हणजे वाणिज्य आणि व्यवस्थापन टीचर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनीचे सचिव प्राचार्य पी. आर. चौधरी आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शन व दिशादर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न होत आहे. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे आणि मार्गदर्शक भूमिकेमुळे परिषदेचे आयोजन अधिक प्रभावी झाले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रियंका ब-हाटे आणि डॉ. राजेंद्रसिंह राजपूत यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. रविंद्र लढे यांनी आभार प्रदर्शन केले. समन्वयक डॉ. उमेश वाणी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे नमूद केले.

ही परिषद दोन दिवस चालणार असून विविध तांत्रिक सत्रांमध्ये देश-विदेशातील संशोधक आपले निबंध सादर करणार आहेत. वाणिज्य, व्यवस्थापन आणि नवकल्पना या क्षेत्रातील नव्या संधी, आव्हाने आणि उपाययोजनांवर सखोल चर्चा होणार असून ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला दिशा देणारी ही परिषद ठरणार आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button