जळगावताज्या बातम्यामहापालिका निवडणुक

जळगाव महापालिका निवडणूक रणधुमाळी; आ. राजु मामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे यांचाही बिनविरोध विजय

मनपाच्या मैदानात महायुतीचा 'विजयी षटकार'; दोन आमदार पुत्रांसह ६ उमेदवार बिनविरोध

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. २ जानेवारी २०२६ :जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या (२ जानेवारी) शेवटच्या दिवशी महायुतीने विरोधकांवर मोठी मनोवैज्ञानिक आघाडी मिळवली आहे. चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यानंतर आता जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे यांनीही बिनविरोध विजय मिळवत बाजी मारली आहे. यासह महायुतीचे एकूण ६ उमेदवार मतदानापूर्वीच विजयी झाले असून यात शिवसेना शिंदे गटाचे ४ तर भाजपच्या २ उमेदवारांचा समावेश आहे.

जळगाव मनपाच्या ७५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आज अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत प्रभाग क्रमांक ७ ‘क’ मधून भाजपचे उमेदवार विशाल सुरेश भोळे यांच्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे त्यांच्या विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका प्रांगणात गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला.

आमदार पुत्रांचा दबदबा

प्रभाग १८ (अ) मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव सोनवणे (शिवसेना शिंदे गट) आणि प्रभाग ७ (क) मधून आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे (भाजप) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचा चौकार

विशाल भोळे यांच्यासह आज प्रभाग १९ (अ) मधून रेखा चुडामण पाटील यांनीही बिनविरोध विजय मिळवला. यापूर्वी प्रभाग ९ (अ) मधून मनोज चौधरी आणि प्रभाग ९ (ब) मधून प्रतिभा देशमुख यांची निवड आधीच निश्चित झाली होती.

भाजपचे दोन शिलेदार

भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांनी प्रभाग १२ (ब) मधून सर्वात आधी बिनविरोध निवडीचे खाते उघडले होते, त्यानंतर आज विशाल भोळे यांच्या रूपाने भाजपला दुसरी जागा मिळाली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेत्यांच्या रणनीतीमुळे महायुतीने मतदानापूर्वीच ६ जागा जिंकल्या आहेत. आता उर्वरित ६९ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार असून, या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button