जळगावमहापालिका निवडणुक

जळगाव शहराच्या राजकारणातील प्रगल्भ नेतृत्व आमदार राजु मामा भोळे

चिरंजीव विशाल भोळेंच्या बिनविरोध निवडीमुळे भोळे कुटुंबीयांचा सामाजिक व राजकीय वारसा अधिक भक्कम

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. १९ जानेवारी २०२६ ( पांडुरंग महाले ) : जळगाव शहराच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन अन् संघर्षातून उभे राहिलेले आणि जनतेच्या विश्वासावर सातत्याने निवडून येणारे आमदार राजू मामा भोळे हे नाव आज जळगावच्या राजकीय इतिहासात ठळकपणे कोरले गेले आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे शहरावरील दीर्घकाळ टिकलेले वर्चस्व असताना, त्यांना पराभूत करून जळगावचा राजकीय बालेकिल्ला काबीज करणारे आमदार राजू मामा भोळे यांची विजयगाथा केवळ एका निवडणुकीपुरती मर्यादित न राहता, तब्बल तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी ‘हॅट्रिक’ साधली आणि नुकत्याच त्यांच्या नेतृत्वात झालेल्या महापालिका निवडणुकीतील प्रचंड आणि अभूतपूर्व यशामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

राजकीय वाटचालीतच नव्हे, तर कुटुंबीयांच्या माध्यमातूनही भोळे कुटुंबीयांनी जळगावच्या सार्वजनिक जीवनात ठसा उमटवला आहे. आमदार राजू मामा भोळे यांच्या सुविद्य पत्नी सीमाताई भोळे यांनी आपल्या धार्मिक आणि सामाजिक कार्यासोबतच महापौर पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या या योगदानामुळे भोळे कुटुंबीयांचे स्थान केवळ राजकारणापुरते न राहता समाजकारणातही अधिक दृढ झाले आहे.

आता या परंपरेत आणखी एक नवे पर्व सुरू झाले असून, आमदार राजू मामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे यांनी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध विजय मिळवत राजकारणात शानदार एन्ट्री केली आहे. भोळे कुटुंबीयांचा  कार्याचा प्रभाव अधिक मजबूत झाला आहे.

नगरसेवक पदापासून राजकीय प्रवास सुरू करून भाजपचे गटनेते, विरोधी पक्षनेते अशी जबाबदारी समर्थपणे पेलणारे आमदार राजू मामा भोळे यांनी संघर्ष, संयम आणि जनतेशी नाते या त्रिसूत्रीवर आपली राजकीय कारकीर्द उभी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फायदा झाला असे जरी म्हटले जात असले, तरी जळगावकरांना बदल हवा होता आणि तो बदल घडवून आणणारे नेतृत्व म्हणून राजू मामा भोळे यांच्यावरच जनतेने विश्वास टाकला, हे वास्तव आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी राजकारणातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने, महापालिका निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे सध्या जळगाव शहराच्या राजकारणात आपली पकड घट्ट केली आहे.

आमदार राजू मामा भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करून महापालिकेस कर्जमुक्त करतांनाच जळगाव शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य व केंद्र शासनाकडून आणण्यात आ.भोळे यांचा मोठा वाटा आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, अशा विविध क्षेत्रांतील विकासकामांमुळे अलीकडच्या काळात जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलत आहे.

जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या पावलावर पाऊल ठेवत कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असो, धार्मिक सोहळा असो, सुख-दुःखाचा प्रसंग असो — ‘अर्ध्या रात्री धावून जाणारे आमदार’ अशी ओळख राजू मामा भोळे यांनी कृतीतून निर्माण केली आहे.

साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद या गुणवैशिष्ट्यां मुळे जिल्ह्यातच नव्हे तर थेट राज्यात त्यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.

महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचंड यशानंतर महापौर निवडतांना त्यांच्या किंग मेकर च्या भूमिकेवर शिक्कामोर्तबच होणार आहे.

आपल्या पहिल्याच निवडणुकीत बिनविरोध निवडीमुळे त्यांचे सुपुत्र विशाल भोळे मामांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा पुढे नेत असल्याचे चित्र दिसत आहे. तरुण, कार्यक्षम आणि तडफदार नेतृत्व म्हणून विशाल भोळे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करताच नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे येत्या काळात भोळे कुटुंबीयांचे राजकीयच नव्हे, तर सामाजिक योगदानही अधिक विस्तारेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

एकंदरीत, राजकारणात सक्रिय असतानाच समाजकारणाला सर्वोच्च प्राधान्य देणारे भोळे कुटुंबीय हे जळगावच्या सार्वजनिक जीवनातील एक मजबूत स्तंभ ठरले असून, आमदार राजू मामा भोळे यांचा राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा विशाल भोळे समर्थपणे पुढे चालवतील, यात कोणतेही शंका नाही.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button