क्राईमजळगांव जिल्हाताज्या बातम्या

जळगावात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; भोंदू बाबा आणि त्याची महिला पोलीस कर्मचारी पत्नीने अघोरी पूजेच्या नावाखाली ११ लाखात गंडवले

ललित पाटील व महिला पोलीस कर्मचारी पत्नी महिमा पाटील, असे संशयित आरोपींची नावे !

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्त धन देण्याच्या नावाखाली एका महिला ग्राफिक डिझायनची तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे. या प्रकरणी भोंदू बाबा ललित पाटील आणि त्याची महिला पोलीस कर्मचारी पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्याविरुद्ध २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, साडेतीन ते चार वर्षांचा कालावधी उलटूनही दोन्ही आरोपी अद्याप फरारच आहेत. पीडित फिर्यादी महिलेने नुकतीच जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेत आरोपींना शोधून तिचे पैसे परत मिळवून देण्याची विनंती केली आहे. पीडित महिला

पीडित महिला आणि आरोपी महिमा पाटील या कॉलेजपासून एकमेकींच्या परिचयातील होत्या. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने मैत्रिणीशी संपर्क साधला असता, महिमाने आपल्या पतीकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून त्यांच्याकडे उपाय असल्याचे पटवून दिले. त्यानंतर ललित पाटील याने ‘अंगात पीर बाबा येतात’ असे भासवत अघोरी विधी सुरू केले. दिराने आत्महत्या केली असून त्याच्या आत्म्याने तुझ्या घरात प्रवेश केला आहे. म्हणून तुमच्या घरात वाद आहे. तुझ्या दिराचा आत्मा तुला त्रास देतोय. म्हणून तुझ्यावर असे प्रसंग पुन्हा पुन्हा ओढवतच राहणार. तुझ्या घरावर करणी केली गेली आहे. ती बाधा काढून घेण्यासाठी तुला पूजा करावीच लागेल अशा पद्धतीने आरोपींनी पीडित महिलेला तिच्या कुटुंबावर करणी झाल्याची भीती दाखवून आपल्या घरी पूजा करून सुरुवातीला लहान रक्कम घेतली. त्यानंतर ‘गुप्त धन’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी लाखो रुपये उकळले. ही रक्कम रोख तसेच ऑनलाईन व्यवहारांद्वारे घेतली गेली. फसवणुकीचा भाग म्हणून आरोपींनी पीडित महिलेसह इतर कुटुंबांना देशभर फिरवले. उज्जैन येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा, गोगामेडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर येथे विविध विधी करण्यात आले. तसेच भारत-पाकिस्तान सीमेवरील तनोट माता मंदिर येथे विशेष पूजा केल्याचे सांगून मोठी रक्कम उकळण्यात आली.

जळगावात परतल्यानंतरही आरोपी दांपत्याने पीडित महिलेच्या घरी मुक्काम करून घरातील बाधा काढण्याच्या नावाखाली पुन्हा पुन्हा पैशांची मागणी केली. बाहेरून कर्ज काढून सातत्याने पैसे देऊनही काहीच फरक न पडल्याने पीडित महिलेने पैसे परत मागितले असता आरोपी ललित पाटील याने “मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन” अशी गंभीर धमकी दिली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव रामानंद पोलिसांनी आरोपी महिमा पाटील ही भांडुप येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे धाव घेतली होती. मात्र, तेथेही ती आढळून आली नाही. पोलिसांचे पथक सातत्याने आरोपींचा शोध घेत असले तरी अद्याप त्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. गुन्हा दाखल होऊन साडेतीन वर्षे उलटूनही आरोपी सापडले नसल्याने पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींचा शोध लावून आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपी महिला पोलीस कर्मचारी असल्यामुळे तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button