
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव १३ मार्च २०२५ |
होळी म्हटली की, झाडाची तोड करून ते झाड होळीच्या ठिकाणी उभे केले जाते. यासाठी मोठमोठी झाडे तोडली जातात. मात्र मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. होळी साजरी करतानाच परिसरातील स्वच्छता व झाडांच्या संवर्धनास प्राधान्य दिले आहे. शाळा परिसरातील कचरा एकत्र करीत त्याला अग्नी देत आपल्या अंगातील दुर्गुणांची होळी करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली.
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी होळीची पूजा करीत झाडे संवर्धनाचा निर्धार सुद्धा यावेळी मुलांनी केला.आमच्या शाळेतील मुलांनी यावर्षी साजरी केलेली होळी आदर्शवत ठरली आहे. समाजाला जागृत करून बदलत्या परिस्थितीनुसार अशाप्रकारे होळी साजरी केली पाहिजे, यातून समाज आणि निसर्ग हितही जपले जाईल, याचे उदाहरण देण्यात आले आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.
याप्रसंगी वृक्ष संवर्धन करण्याची शपथ शिक्षिका रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या होळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षिका कविता सानप यांनी होळीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कोळी यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.