
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २९ जानेवारी २०२५ |
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आज (ता.२९) महत्वाचा दिवस आहे. यामुळे कुंभमेळ्याच्या ठिकाणी लाखो भाविकांची गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये प्रयागराजमधील त्रिवेणी संगम परिसरात रात्री १ च्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत २० हून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० पेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून प्रयागराज येथील घटनेचा आढावा घेतला आहे.
मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानासाठी प्रयागराजमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांनी मध्यरात्री त्रिवेणी संगमावर मोठी गर्दी केली. यावेळी अपेक्षेपेक्षाही जास्त भाविकांची मोठी गर्दी झाली. या चेंगराचेंगरीत काहींनी बॅरिकेट तोडल्याने लोक एकमेकांच्या अंगावर पडले यात शेकडो लोक एकमेकांच्या अंगावर दाबले गेले. २० जणांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही मिनिटांतच पोलिसांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली.
कुंभमेळ्याचे अधिकारी आकांक्षा राणा म्हणाले की, ”त्रिवेणी संगमाजवळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली होती. काही बॅरिकेट तुटले. एकाच ठिकाणी मोठी गर्दी निर्माण झाल्यानं हा प्रकार घडला. जखमींना आम्ही रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात कुणीही गंभीर जखमी नाही”, अशी माहिती कुंभमेळ्याच्या अधिकारी आकांक्षा राणा यांनी दिली.





