जळगांव दि.०७ : जळगाव येथील सुप्रसिद्ध व शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ओंकारेश्वर मंदिरावर शुक्रवार, दिनांक ८/०३/२०२४ माघ वद्य १३ प्रदोष रोजी श्री महाशिवरात्री महोत्सव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्या निमित्त संपूर्ण मंदिर परीसर अत्यंत सुशोभीत करण्यात आला आहे. दर्शनार्थ भाविकांना जाण्या-येण्याच्या मार्गामध्ये पाईप रेलींग लावण्यात आलेले आहे. संपूर्ण मंदिर परिसर रंगरंगोटी करून अत्यंत सुशोभीत करण्यात आले आहे.
श्री महाशिवरात्री निमित्त शुक्रवार पहाटे ४ वाजता दर्शनार्थ मंदिर उघडण्यात येणार असून संपूर्ण दिवस व रात्री संपूर्ण २४ तास ७ विशेष पर्वामध्ये शिव अभिषेक पूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रथम पर्व सकाळी ५ ते ७, द्वितीय पर्व १० ते १२, तृत्तीय पर्व दुपारी ४ ते ६ प्रदोषकाल; प्रथम पर्व रात्री ७ ते ९, द्वितीय पर्व रात्री १० ते १२, तृतीय पर्व रात्री १ ते ३, चतुर्थ पर्व पहाटे ४ ते ६ अशा ७ विशेष पर्वांमध्ये शिव अभिषेक पूजनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. अभिषेक पूजनानंतर विशेष आरतीचा कार्यक्रम होईल. दुपारी ठिक १२ वाजता अभिजित मुहूर्ताला व सायंकाळी गोरज मुहूर्ताला ६ वाजता विशेष १०८ निरंजन्याद्वारे महाआरतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
संपूर्ण मंदिरावर व परीसरात नयनरम्य, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच रात्री ७ ते १२ पर्यंत श्री सत्संग भजन मंडळाकडून सुश्राव्य शिवभजनांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. देवदर्शनार्थ मंदिर दिवस रात्र उघडे राहील. संपूर्ण दिवस व रात्री भाविकांना विशेष प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी महाशिवरात्री महोत्सव पर्वावर नयनरम्य असे श्रृंगाराचे शिवदर्शन व विशेष तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा.असे आवाहन ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दीपक जोशी यांनी केले आहे.