वयोवृद्धांची फसवणूक करून लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले गजाआड
२५ हजारांच्या रोकडसह रिक्षा जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव दि. १ : (प्रतिनिधी): वयोवृद्धांना रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळीला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून २५ हजार रुपये रोख आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली असून, तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
दि. २९ मार्च २०२५ रोजी शेख फिरोज शेख शादुल्ला (वय ५०, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) हे अजिंठा चौफुली, जळगाव येथे नांदुरा जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होते. त्यांच्या जवळील २५,००० रुपये रोख असलेली प्लास्टिक पिशवी सोबत होती.
यावेळी एक रिक्षाचालक त्यांच्याकडे आला आणि खामगावला जात असल्याचे सांगून त्यांना रिक्षात बसण्यास सांगितले. काही अंतर गेल्यावर मागच्या प्रवाशांनी बसायला जागा नसल्याचे कारण सांगून फिर्यादींना खाली उतरवले. आपल्याकडे असलेल्या पिशवीकडे पाहिल्यावर ती कापलेली असल्याचे लक्षात आले आणि त्यातील २५,००० रुपये गायब झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींने तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी ‘नेत्रम प्रकल्प’ सुरू केला आहे. याअंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलिस नियंत्रण कक्षाशी थेट जोडले आहेत.
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, सहकारी चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, राहुल रगडे, विशाल कोळी, रतन गिते, गणेश ठाकरे यांनी ‘नेत्रम’ प्रकल्पाच्या सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला.
संशयास्पद रिक्षा आढळल्यावर पोलिसांनी वसीम कय्युम खाटीक (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि सहकारी तौसीफ खान सत्तार खान (रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) व एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे सांगितले.
सराईत गुन्हेगार तौसीफ खान पोलिसांच्या जाळ्यात
तौसीफ खान हा सराईत गुन्हेगार असून जबरी चोरीचे तीन गुन्हे त्याच्या नावावर आहेत. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे या आरोपींना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. संशयितांकडून २५,००० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली बजाज रिक्षा (MH19-CW-5250) जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी हे करीत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
ही कारवाई नेत्रम प्रकल्पामुळे यशस्वी झाली असून, शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही बसवून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





