जळगावकरांनो, पाणी जपून वापरा; मुलांच्या हातातही गरजेपुरताच मोबाईल द्या!

नगरसेवक विशाल भोळे यांचे आवाहन; दुर्गामाता महिला मंडळाच्या आरतीप्रसंगी नागरिकांना दिला महत्त्वाचा संदेश
| लोकमाध्यम News| ( पांडुरंग महाले ) जळगाव : जिल्ह्यासह राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, जळगाव शहराला धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला, तरी नागरिकांनी भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून उन्हाळ्यापर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी काळजी घ्यावी आणि त्यांना केवळ गरजेपुरताच मोबाईल वापरू द्यावा, असे आवाहन नगरसेवक विशाल सुरेश भोळे यांनी केले.
देविदास कॉलनी महिला मंडळ येथे अंबा मातेची आरती केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, उपलब्ध पाणी हा अमूल्य नैसर्गिक ठेवा आहे. प्रत्येकाने आपल्या गरजेपुरतेच पाणी वापरून त्याची नासाडी टाळली पाहिजे. आजपासूनच पाणी बचतीची सवय लावल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करणे सोपे होईल. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच विविध उपाययोजना आणि पाणी बचतीचे संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुलांच्या मोबाईल वापरावर पालकांनी लक्ष द्यावे
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांच्या हातात सहजपणे मोबाईल दिला जातो. मात्र, मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते. अनेक मुले नाश्ता, जेवण किंवा दूध घेतानाही मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. ही बाब लक्षात घेऊन पालकांनी मुलांना मोबाईल वापरण्याची सवय लावताना योग्य मर्यादा घालणे आवश्यक आहे. मुलांच्या हातात केवळ गरजेपुरताच मोबाईल द्यावा आणि त्यांच्या आरोग्याबरोबरच दैनंदिन सवयींकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन नगरसेवक विशाल भोळे यांनी केले.
प्रारंभी महिला मंडळाच्या वतीने विशाल भोळे यांचा माधुरी बोरोले, नंदा चौधरी,शुभांगी वाघळे,पल्लवी चौधरी, शारदा झाल्टे,लीना चौधरी, शारदा शिंपी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी अपर्णा मैती, भारती वाणी, अनिता चौधरी, रत्ना जगताप, मंगला वाघ,पूनम जगताप,चेतन चौधरी,राहुल झाल्टे,ऋषिकेश शिंपी,हर्षद झाल्टे,आदींसह मोठ्या संख्येने महिला भाविक पुरुष मंडळी उपस्थित होती.





