जळगावात प्रथमच ‘श्री गौकृपा कथा’चे भव्य आयोजन
संगणक अभियंता ते गौसेविका बनलेल्या साध्वी कपिला गोपाल सरस्वतीजींचे प्रेरणादायी आगमन

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ११ नोव्हेंबर : शहरातील पांजरपोळ संस्था गौतीर्थ नेरीनाका येथे अध्यात्म आणि गोसेवेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. पांजरपोळ संस्थेतर्फे तसेच जळगाव माहेश्वरी महिला मंडळाच्या सहकार्याने ११ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दुपारी ३ ते ६ या वेळेत शहरात प्रथमच भव्य अलौकिक श्री गौकृपा कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचा लाभ शहरातील सर्व नागरिकांनी विशेषतः तरुण पिढीने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या भव्य कथेकरिता साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी यांचे आज जळगावात आगमन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी संगणक अभियांत्रिकी (बी.टेक.)चे शिक्षण पूर्ण करून मोठ्या पगाराची नोकरी व संसाराचा मोह सोडत त्यांनी राष्ट्रसेवा आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग स्वीकारला. देशभरात फिरत त्या गौसेवा, गोवैद्यकीय उपचार आणि व्यसनमुक्तीचे कार्य करत आहेत. आतापर्यंत त्यांनी देशभरात ४०० हून अधिक गौकथा, गौराम कथा, भागवत कथा तसेच नानी बाई का मायरा यांसारखे भव्य आध्यात्मिक कार्यक्रम केले आहेत.
दीदीजींच्या जीवनातील वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मागील अकरा वर्षांपासून अन्न त्याग, मोबाईलपासून पूर्ण दूरत्व, पादत्राणांचा त्याग, तसेच शुद्ध शाकाहार आणि गोउत्पादनाधारित आहार हे जीवनव्रत अंगीकारले आहे. हजारो गाईंची निःस्वार्थ सेवा, शारीरिक व्याधीग्रस्तांना आरोग्यदायी जीवन आणि गोसेवेचा प्रसार हेच त्यांचे ध्येय बनले आहे.
विशेष म्हणजे, कपिला दीदीजींचे मूळ शिक्षण आर.आर. विद्यालय जळगाव येथे झाले असून पुढे त्यांनी बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक. पदवी संपादन केली. आज त्या स्वतःच्या जीवनातून ‘गाईत देव आहे’ या संकल्पनेचा प्रसार करत देशभरात अध्यात्माचा प्रकाश पसरवत आहेत.
जळगावकरांसाठी ही गौकृपा कथा अध्यात्म, संस्कार आणि गोसेवेचे प्रेरणादायी पर्व ठरणार असून पांजरपोळ गौतीर्थ परिसर या पाच दिवसांत भक्तिमय होणार आहे.







