क्राईमजळगांव जिल्हाताज्या बातम्या

बेपत्ता तरुण मृतावस्थेत आढळला; जुन्या वादातून दोन मित्रांनीच केली हत्या !

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १९ डिसेंबर २०२५ : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या स्थितीत आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, एमआयडीसी पोलिसांनी गुजरात येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय २७) हा तरुण १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता. निलेशचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. रामदेववाडी परिसरात त्याची दुचाकी मिळून आली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.

एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना काही संशयास्पद माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक पाठवून गुजरात राज्यातून भूषण बाळू पाटील आणि दिनेश चौधरी (महाजन) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी जुन्या किरकोळ वादातून निलेशची हत्या केल्याची कबुली दिली. आणि त्याला मारून पोत्यात भरून रामदेववाडी येथील जंगलामध्ये असलेल्या पाण्यात टाकून दिले.

संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली ते रामदेववाडी दरम्यानच्या जंगलात शोधमोहीम राबवली. सकाळी १० वाजेच्या सुमारास रामदेववाडी येथील घनदाट जंगलात तलावातील पाण्यात निलेशचा मृतदेह मिळून आला.

या घटनेमुळे जामनेर आणि जळगाव परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button