मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा; जिल्हाधिकारी रोहन घुगे
जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. २५ जानेवारी २०२६ : १ जानेवारी २०२६ रोजी १८ वर्षे पुर्ण झालेल्या युवकांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा) अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसिलदार शीतल राजपूत, ज्येष्ठ मतदार वसंतराव पाटील, दिव्यांग मतदार निलेश सरोदे व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.घुगे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत एका मताला सुध्दा खुप महत्व आहे, मतदान करणे आपले सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे सांगून त्यांनी मतदान प्रक्रियेची महत्व स्पष्ट केले. तसेच १८ वर्ष पूर्ण करून प्रथमच मतदानाची संधी मिळालेल्या नवमतदार युवक-युवतींनी मतदानासाठी पुढे यावे, तसेच स्वतः मतदान करण्याबरोबरच कुटुंबीय, मित्रमंडळी व समाजातील इतरांना मतदार नोंदणी व मतदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतामध्ये सुमारे ९६ ते ९८ कोटी मतदार असून भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे नमूद करुन, मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठीच्या प्रक्रियेबाबतही जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर यांनी मतदानाविषयी जनजागृती करुन मतदान करण्याचे आवाहन केले तर अपर पोलिस अधिक्षक श्री.नखाते यांनी मतदानाचे महत्व विशद करुन मतदान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ मतदार वसंत पाटील, दिव्यांग मतदार निलेश सरोदे, नवमतदार मुस्कान सैय्यद यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विनय सोगावी यांनी केले. यावेळी मान्यवर व उपस्थितांनी मतदान प्रतिज्ञा घेतली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मतदारांसाठी संदेशाची चित्रफीत दाखविण्यात आली.
कार्यक्रमात, ज्येष्ठ मतदार व दिव्यांग मतदार यांचा सन्मान करण्यात आला, नवमतदारांना प्रातेनिधीक स्वरुपात इपीक्स कार्डचे वितरण करण्यात येऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना मतदान केद्रंस्तरीय अधिकारी यांना स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





