विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई १ कोटी ६ लाख १७ हजाराचा गुटखा जप्त
लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.२० जुलै २०२४ |
मध्यप्रदेशातून गुटखा घेवून येणाऱ्या कंटेनवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केली. त्या वाहनातून सुमारे १ कोटी ६ लाख १७ हजार ८०० रुपयांचा राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने दि. २० जुलै रोजी सकाळी मुक्ताईनगर पोलीस ठाणे हद्दीतील बऱ्हाणपुर चौफुली येथे सापळा रचला. याठिकाणाहून गुटख्याची वाहतुक करणारे (एचआर ५५, ऐक्यू ३८७३) क्रमांकाचे कंटरनेला पथकाने थांबवले.
त्या कंटेनरची तपासणी केली असता, त्यामध्ये १ कोटी ६ लाख रुपयांचा पान मासला आणि जर्दा मिळून आला. पोलिसांनी गुटख्याची वाहतुक करणाऱ्या कंटेनर चालक लियाकत अली इस्लाम खान (रा. मचरोली, जि. मेवात, हरियाणा) व ट्रान्सपोर्ट करणारा सतीश शर्मा (रा. दिल्ली) व त्यांचा हस्तक मुबारक रा. दिल्ली व कंपनी मालक नीलू पंजाबी उर्फ निशू (रा. भिवाडी, राजस्थान) यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे, पोहेकॉ तुषार पाटील, विक्रांत मांगडे, विजय बिलगे, प्रमोद मांडलिक, चालक पो.शि. सुरेश टोंगारे यांच्या पथकाने केली.