जळगांव जिल्हाआर्थिकगुन्हे

जामनेरात आयपीएलवर ऑनलाईन बेटिंगच्या अड्ड्यावर धाड ; ‘चौकडी’ला अटक 

१० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त ; एलसीबीची कारवाई 

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. १० मे :आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या टोळीवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत जामनेर शहरातील हिवरखेडा रोड परिसरातील सट्टा अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जामनेर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन पद्धतीने सट्टा घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत संबंधित घरावर धाड टाकली. छाप्यावेळी आरोपी मोबाईल फोन तसेच विविध ऑनलाइन अॅप्सच्या माध्यमातून सट्टा व्यवहार करत असल्याचे उघड झाले.

असा जप्त केला मुद्देमाल

या कारवाईत पोलिसांनी ९ लाख २ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, २५ हजार रुपये किमतीचा टीव्ही व साउंड बार, ४१ एटीएम कार्ड तसेच इतर साहित्य असा एकूण १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चौघांविरोधात गुन्हा

या प्रकरणात देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रविंद्र पाटील आणि प्रवीण जगन्नाथ टहाकडे (सर्व रा. जामनेर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली  कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत डीवायएसपी प्रशांत दरेकर,पीएसआय शेखर डोमाळे तसेच एलसीबी व सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदारांचा सहभाग होता.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button