रौप्य महोत्सवी वर्षात ‘बालगंधर्व संगीत महोत्सव’ यंदा सर्वांसाठी मोफत; चार दिवसांची सांगीतिक मेजवानी!

७ ते १० जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात रंगणार सोहळा; शास्त्रीय गायन, कथक व ‘बॉलिवूड घराणा’ कार्यक्रमाचे आकर्षण!
| लोकमाध्यम NEWS | जळगाव (प्रतिनिधी) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘बालगंधर्व संगीत महोत्सवा’चे यंदा २५ वे म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने यंदा हा सोहळा तीनऐवजी चार दिवसांचा रंगणार असून, रौप्य महोत्सवानिमित्त संपूर्ण महोत्सव सर्व रसिकांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, दीपक चांदोरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
येथील छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात ७, ८, ९ आणि १० जानेवारी २०२७ रोजी दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत हा सोहळा पार पडणार आहे. या २५ व्या महोत्सवाच्या आयोजनास महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (उदयपूर) आणि भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून, सुहान्स केमिकल्स प्रा. लि. व चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. (होस्टिंग ड्युटी) यांचेही सहकार्य मिळाले आहे.
अशी रंगणार चार दिवसांची सांगीतिक मैफल ..
पहिला दिवस ७ जानेवारी : उद्घाटनानंतर पंडिता मंजूषा पाटील-कुलकर्णी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, तसेच प्रमोद वाघ, श्रेया कुलकर्णी व नयन कोहले यांचा ‘त्रिमिती’ कथक नृत्य आविष्कार होईल.
दुसरा दिवस ८ जानेवारी : सहजदीप सिंग यांचे गझल-ठुमरी गायन व पं. रुद्र शंकर मिश्रा यांचे कथक नृत्य सादर होईल.
तिसरा दिवस ९ जानेवारी : पंडिता भारती राजपूत यांचे शास्त्रीय गायन व पं. रामदास पळसुले आणि पं. कृष्णा साळुंखे यांची तबला-पखवाज जुगलबंदी रंगेल.
चौथा दिवस १० जानेवारी : नाट्यसंगीत व अभंगवाणीसह तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी खास ‘बॉलिवूड घराणा’ हा कार्यक्रम सादर केला जाईल. चारही दिवसांचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर करणार आहेत. पत्रकार परिषदेस शरदचंद्र छापेकर, दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, दीपिका चांदोरकर,नुपूर खटावकर, डॉ.अपर्णा भट/कासार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम मोफत, पण प्रवेशिका आवश्यक
चारही दिवसांचा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असला तरी प्रवेशासाठी मोफत प्रवेशिका आवश्यक आहे. सभागृहातील पहिल्या १५ रांगा देणगीदारांसाठी राखीव असून उर्वरित सर्व रांगा रसिकांसाठी खुल्या असतील. प्रवेशिका दाखवल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे. रसिकांनी प्रवेशिकेसाठी दीपिका चांदोरकर मोबाईल क्र. ९८२३०७७२७७ / २२२७७२२ स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान १०१, पार्क रॉयल, १३, वल्लभ नगर, रामानंद चर्च जवळ, जळगाव यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून क्रमांकित प्रवेशिका प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




