नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; राज्यभर गाजलेल्या प्रकरणात आरोपीला मृत्युदंड
| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली. राज्यभर संतापाची लाट उसळलेल्या या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवल्यानंतर शिक्षेचा निकाल २९ जूनसाठी राखून ठेवला होता. अखेर सोमवारी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा जाहीर केली.
या प्रकरणात १ मे २०२६ रोजी आरोपीने चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी चिमुकलीचा हात धरून नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले होते. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली होती. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली होती.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत क्रूर, अमानुष आणि समाजमन हादरवणारे असल्याचे नमूद केले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, उपलब्ध पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ विचारात घेऊन हा निर्णय देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
शिक्षा सुनावली जात असताना न्यायालयात चिमुकलीचे आई-वडील उपस्थित होते. त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याच्या कृत्याचा निषेध करत कठोर शिक्षेची मागणी केली होती. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध संघटना, नागरिक आणि राजकीय नेत्यांनी चिमुकलीच्या कुटुंबीयांना भेट देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. अखेर विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावून या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल दिला.






