
| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जोशीपेठ परिसरातील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासूमवाडी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जोशीपेठ परिसरातील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. मुस्तकीम हा आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करत होता. इलेक्ट्रिक वायर जोडण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने मुस्तकीमला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.
घटना घडताच त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तातडीने त्याला उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मुस्तकीमच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. यावेळी कुटुंबीय आणि मित्रांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
मुस्तकीम गेल्या सुमारे वीस दिवसांपासून एका ठेकेदाराकडे इलेक्ट्रिक काम करत होता. त्याच्या वडिलांचा मसाले विक्रीचा व्यवसाय असून, मुस्तकीमच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी संबंधित तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे मासूमवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






