जळगावशैक्षणिकसांस्कृतिक

उमंग तरंग’च्या सुरेल प्रवासातून बालदिनाचा आनंदोत्सव; बालकलाकारांच्या कलाविष्काराला जळगावकरांची दाद!

अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतन आणि माणुसकी सेवा फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम;

| लोकमाध्यम NEWS | जळगाव (प्रतिनिधी) : नृत्य, गायन, संगीत आणि रामायणातील प्रसंगांच्या प्रभावी सादरीकरणातून बालकलाकारांनी आपल्या कलागुणांची अनोखी झलक दाखवली. चिमुकल्यांच्या उत्साहाने, सुरेल स्वरांनी आणि नृत्याविष्काराने भाऊंचे उद्यानातील अ‍ॅम्फीथिएटर बालमय झाले. निमित्त होते बालदिनाचे आणि त्यानिमित्ताने आयोजित ‘उमंग तरंग’ या बालकलागुणांच्या उत्सवाचे. बालकलाकारांच्या प्रतिभेला जळगावकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

बालदिनाचे औचित्य साधून अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतन आणि माणुसकी सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊंचे उद्यान येथील अ‍ॅम्फीथिएटरमध्ये या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, अभिनेत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या गीतांजली ठाकरे, माणुसकी सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभदा नेवे आणि अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनचे प्राचार्य मनोज परमार उपस्थित होते.

बालकलाकारांच्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमातून आपल्यालाही बालपणाची आठवण झाल्याची भावना खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली. बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा व्यासपीठांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात बालकलाकारांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मनोज परमार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. बालकलाकारांच्या चिठ्ठ्यांमधून आरव हर्षद जैन आणि अग्रजा गौरव कुलकर्णी यांची व्यासपीठावर येण्यासाठी निवड करण्यात आली. ‘उमंग तरंग’चे पोस्टर फुग्यांसह आकाशात सोडून कार्यक्रमाचे विशेष उद्घाटन करण्यात आले. सहभागी सर्व बालकलाकारांचे गुलाबपुष्प आणि प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.उमंग तरंग’च्या सुरेल प्रवासाची सुरुवात अर्थम अथांग जैन आणि सहकाऱ्यांनी ‘अच्युतम केशवम’ हे गीत की-बोर्डवर सादर करून केली. वैदेही वाणी हिने ‘ओ माय फ्रेंड गणेशा’ या गाण्यावर नृत्य सादर केले. अग्रजा कुलकर्णी हिने शिवस्तुती गायली, तर सोहम जोशी याने ‘माय भवानीचा वाघ तू रे’ हे स्फूर्तिदायी गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. आरूह्या वरुण देशपांडे हिने ‘अरे नंदिनी’ हे सादरीकरण केले. याशिवाय नृत्य, गायन, संगीत आणि रामायणातील प्रसंगांच्या सादरीकरणातून बालकलाकारांनी आपल्या विविधांगी प्रतिभेचा परिचय करून दिला.

आर्या कुलकर्णी आणि स्पृहा नेवे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन केले. शुभदा नेवे, वंदना पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर शिल्पा दीक्षित यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतन आणि माणुसकी सेवा फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button