
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव १९ जानेवारी २०२५ |
प्रतिनिधी- शहरातील पिंप्राळा परिसरातील हुडको येथे एका 24 वर्षीय तरुणाची हत्या करून त्याच्या कुटुंबीयांवर चाकू कोयता आणि चापर याने प्राण घातक हल्ला चढवून सात ते आठ जणांनी गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी या हत्याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन-चार वर्षांपूर्वी मुकेश शिरसाट याने पळून जात परिसरात राहणाऱ्या पूजा हिच्याशी प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहाचा राग पूजा यांच्या कुटुंबीयांच्या मनात होता. तो राग आज उफाळून आला.
पूजा हिचे काका सतीश केदार, भाऊ प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, पंकज सोनवणे, राहुल सोनवणे, अश्विन सुरवाडे, बबल्या गांगले, विकी गांगले याच्यासह अन्य दोन जणांनी येऊन मुकेश याच्यावर कोयता चाकू या धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. यात मुकेश शिरसाट याच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर जीवघेणे वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
तसेच मुकेश याच्यावर हल्ला होत असताना त्याला वाचविण्यासाठी आलेल्या भाऊ सनी शिरसाट, निळकंठ शिरसाट, कोमल शिरसाट, ललिता शिरसाट, यांच्यासह दोन लहान मुलांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटने प्रकरणी सनी शिरसाट याच्या फिर्यादीवरून सतीश केदार, प्रकाश सोनवणे, बबलू बनसोडे, सुरेश बनसोडे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले, राहुल सोनवणे आदिं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.