
| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. २० : वाढते प्रदूषण आणि इंधन बचतीचा संदेश देत जळगाव शहर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला काळे यांनी दर बुधवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे आवाहन प्रशासनाला केले होते. या आवाहनाला स्वतःपासून सुरुवात करत, आज त्यांनी स्वतः सायकल चालवत महापालिका कार्यालय गाठले. महापौरांच्या या कृतीशील आणि पर्यावरणपूरक निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत होत आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद
महापौरांच्या या आवाहनानंतर जळगाव मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील यामध्ये हिररीने सहभागी झाले. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या खाजगी वाहने आणि बाईकचा वापर टाळला. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘टू-व्हीलर शेअरिंग’ (एकाच गाडीवरून दोघे येणे) पद्धतीचा वापर केला, तर अनेक जण चक्क पायदळ चालत महापालिकेत आले. मनपा प्रशासनाने दाखवलेल्या या शिस्तीमुळे आज महापालिका परिसर गाड्यांविना मोकळा श्वास घेताना दिसला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशातील जनतेला इंधनाचा वापर कमीत कमी करण्याचे आणि पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले आहे. याच आवाहनाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी जळगावात ‘नो व्हेईकल डे’ आणि ‘टू-व्हीलर शेअरिंग’ची संकल्पना मांडली असून, ती प्रत्यक्षात आणली आहे.
पर्यावरणपूरक जीवनशैली ही काळाची गरज आहे. जळगावकरांनी देखील आठवड्यातून किमान एक दिवस इंधनाचा वापर कमीत कमी करावा आणि या मोहिमेत सहभागी व्हावे. असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे.





