जळगावक्राईम

गोलाणी मार्केटमध्ये दिवसाढवळ्या चाकूहल्ला; १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

किरकोळ वादातून महाविद्यालयीन मित्राकडून सपासप वार; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ३१ डिसेंबर २०२५ :शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी (ता. ३१) दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेने एकच खळबळ उडाली. किरकोळ वादातून १८ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या तरुणाचा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली. एकुलता एक मुलगा गमावल्याने आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. साई गणेश गोराडे (वय १८, रा. डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

साई गोराडे हा डीएनसी कॉलेज परिसरात आई-वडील, बहिण तसेच आजी-आजोबांसोबत वास्तव्यास होता. सध्या तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. शुभम सोनवणे (रा. कालिंका माता मंदिर परिसर, जळगाव) हा त्याचा महाविद्यालयीन मित्र असून, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. बुधवारी सकाळीही दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ३१ डिसेंबर असल्याने साई दुपारी अडीचच्या सुमारास आईला सांगून गोलाणी मार्केटमध्ये काही खाण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गेला होता. याच संधीचा फायदा घेत शुभम सोनवणे याने गोलाणी मार्केटमधील नेक्स्ट शोरूमसमोरील रस्त्यावर साईवर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना, बाजारात असलेल्या  पोलीस कर्मचारी रमेश बाबुलाल चौधरी यांनी त्याला जागीच पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

या हल्ल्यात साई गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याची प्राणज्योत मालविली. एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून रुग्णालयात आई-वडिलांचा हृदयद्रावक आक्रोश ऐकायला मिळाला.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दिवसाढवळ्या गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button