चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा निर्धार : मोदी सरकार पुन्हा आणणार
![](https://lokmadhyam.com/wp-content/uploads/2024/04/IMG_20240428_132651-780x470.webp)
चाळीसगाव दि.२८ : शेतीमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या अत्याधुनिक ई-नाम प्रणालीशी जोडल्या गेल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतीमालाच्या खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाची देखील सोय झाली आहे. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आम्ही आतुर असल्याची भावना चाळीसगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित शेतकरी, कष्टकरी, व्यापारी यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते स्व. रामराव जिभाऊ पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करून प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. दरम्यान, भ्रष्ट्राचारी महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा भोंगळ कारभार आम्ही जवळून अनुभवला आहे. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात किसान सन्मान योजना, शेतमालाला विक्रमी हमीभाव, शेती पिकांना पंतप्रधान पिकविमा योजनेचे संरक्षण दिल्याने अल्पभूधारक आणि कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे, अशी प्रतिक्रिया बऱ्याच शेतकऱ्यांनी दिली.