ताज्या बातम्याजळगांव जिल्हामहाराष्ट्र

राज्यातील कंत्राटदारांचा आक्रमक पवित्रा; शासनाला दिला निर्वाणीचा इशारा

प्रलंबित देयकांसाठी ३ जूनपासून न्यायालयीन आणि रस्त्यावरही लढा

लोकमाध्यम न्युज जळगांव दि. २५ : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील कंत्राटदारांनी केलेल्या कामांच्या कोट्यवधींच्या प्रलंबित देयकांच्या संदर्भात राज्यभरात आता न्यायालयीन व रस्त्यावर उतरुन लढाई लढण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांनी घेतला आहे.

या दोन्ही संघटनांची संपूर्ण राज्यातील पदाधिकारी व संचालक यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक पार पडली.
या बैठकीत ३१ मार्च २०२५ नंतर आतापर्यंत झालेल्या काळातील सगळ्या विभागांचा परीस्थितीचा आढावा घेण्यात आला. या वेळी ३१ मार्च नंतर शासन लगेच नवीन आर्थिक वर्षात कंत्राटदार यांची देयके देण्याबाबत व इतर मागण्यांबाबत निर्णय घेणार आहे असे संघटनेस शासनाकडून आश्र्वासित करण्यात आले होते. परंतु याबाबत आजपर्यंत शासनाकडून काहीही ठोस निर्णय कंत्राटदार बाबतीत झाला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे बैठकीत मांडण्यात आले.
यामुळेच दोन्ही संघटनेच्या व राज्यातील ३ लाख कंत्राटदार यांच्यातर्फे गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, नगरविकास यांना मागण्या सादर करत सर्व‌ विभागांचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित विभागांचे सचिव यांनी संघटनेच्या शिष्टमंडळबरोबर सोबत बैठक घ्यावी अशी विनंती केली होती. परंतु प्रत्यक्षात सदर शासनाचे मंत्री व संबंधित विभागांचे सचिव फक्त कागदपत्रे फिरविण्यातच दंग आहे या विषयावर एक बैठक घेऊ शकत नाही.

शासनाकडे पैसा, आडका नाही, नवीन कामांची प्रशासकीय मान्यता नाही, मागील व आता सुरू असलेल्या सर्व‌ बेकायदेशीर कारभार बद्दल चकार शब्द व कारवाई नाही राज्यात सर्व‌ विभागाकडील झालेल्या विकासांच्या कामांना सहा ते नऊ महिन्यांपासून निधीचे वाटप नाही अशी सगळ्यांच बाबतीत अनागोंदी कारभार सध्या राज्यात सुरु आहे. यामुळे राज्यातील कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणारे करोडो घटक अक्षरश: हवालदिल झाले आहेत .

३ जूनपासून तीव्र लढा
यामुळेच आता न्यायालयीन लढाई व‌ काम बंद‌ आंदोलनासह रस्त्यावरील आक्रमक आंदोलन ३ जूनपासून सुरु करण्याचा निर्णय बहुसंख्येने उपस्थित असलेल्या पदाधिकारी व संचालक यांनी घेतला आहे. या वेळी राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे कार्याध्यक्ष संजय मैंद, महासचिव सुनील नागराळे, विभागीय अध्यक्ष सुरेश कडू, राज्य अभियंता संघटनेचे महासचिव राजेश देशमुख, विभागीय अध्यक्ष कांतीलाल डुबल, राज्य उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.
——–एकीकडे अनेक महिन्यांपासून कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित आहेत.. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाचे अधिकारी कामे करण्यासाठी दबावतंत्र अवलंबत आहेत.. शिवाय, कामे न केल्यास दंड लावण्याची व काळ्या यादीत टाकण्याची धमकीही देत आहेत. असे झाल्यास अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा ठराव या ऑनलाईन बैठकीत करण्यात आला.
राहुल सोनवणे
राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ.
———-

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button