जळगांव जिल्हाक्राईम

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सात दरोडेखोरांना अटक ; घातक शस्त्रांसह मुद्देमाल हस्तगत

चोपडा शहर पोलिसांची कारवाई

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. २७ ऑक्टोंबर २०२५ चोपडा (प्रतिनिधी) – दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सात जणांच्या कुख्यात टोळीला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, मॅकजीन ,तलवारी, यासह अन्य मुद्द्यमाल हस्तगत करण्यात आला आहे..

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील शिरपूर बायपास रोडवर मध्यरात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास चोपडा शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी (MH-26 CH-1733) रस्त्यावर बराच वेळ थांबलेली असल्याचे कळले. यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ शोध मोहीम हाती घेतली. रणगाडा चौकाजवळ संशयास्पद वाहन दिसताच पोलिसांनी वेढा घालून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातही संशयितांना ताब्यात घेतले.

गाडीची झडती घेतली असता दोन संशयितांकडे लोडेड गावठी पिस्तुले, तर गाडीतून दोन तलवारी आणि एक रिकामे मॅगझीन जप्त करण्यात आले.

आरोपी सराईत गुन्हेगार ; विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल

अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांमध्ये

दिलीपसिंह हरिसिंह पवार (वय ३२, रा. नाथनगर, नांदेड),

विक्रम बाळासाहेब बोरगे (वय २४, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर),

अनिकेत बालाजी सूर्यवंशी (वय २५, रा. नवामोंढा, नांदेड),

अमनदीपसिंह अवतारसिंह राठोड (वय २५, रा. मगनपूरा, नांदेड),

सदामहुसेन मोहम्मद अमीन (वय ३३, रा. इतवारा, नांदेड),

अक्षय रविंद्र महाले (वय ३०, रा. भावसार गल्ली, चोपडा),

जयेश राजेंद्र महाजन (वय ३०, रा. भाट गल्ली, चोपडा), हे असून त्यांची अधिक चौकशी केली असता

हे सर्व आरोपी कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजवणे आणि बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही आरोपींवर नांदेड, वैजापूर आणि चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असून, काहींवर MPDA कायद्यांतर्गत कारवाई झालेली आहे. हे आरोपी अलीकडेच कारागृहातून सुटलेले आहेत.

तपासात असेही उघड झाले की, हे सर्वजण संगनमताने रस्त्यावर दरोडा आणि लूट करण्याच्या उद्देशाने शस्त्रसज्ज अवस्थेत एकत्र जमले होते.

याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी गु.र.नं. ५८१/२०२५ अंतर्गत भा.द.वि. कलम ३१०(४), ३१०(५), शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली.

आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत

या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्तूल, तलवारी, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चारचाकी वाहन असा एकूण १३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

सखोल तपासातून असेही समोर आले की, नांदेड परिसरात हे आरोपी शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसूल करणे, अपहरण आणि मारहाण करून व्हिडिओ बनवणे यासारख्या कृत्यांद्वारे दहशत पसरवत होते.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे तसेच पोलीस कर्मचारी हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवळे, अजिंक्य माळी, अमोल पवार, मदन पावरा, रविंद्र मेढे, विनोद पाटील, किरण धनगर, योगेश पाटील आणि प्रकाश ठाकरे यांनी सहभाग घेतला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button