माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी चोरी
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबवला; शहरात खळबळ

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. २८ ऑक्टोंबर २०२५ : जळगाव शहरात चोरट्यांच्या साखळी घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ या निवासस्थानी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शहरभर एकच खळबळ उडाली असून, राजकीय नेत्यांच्या घरांनाही सुरक्षेची हमी उरली नाही, अशी चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवरामनगर परिसरातील ‘मुक्ताई’ बंगला दिवाळीच्या सुटीत बंद होता. एकनाथराव खडसे हे या काळात मुक्ताईनगर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर पोहोचले असता, मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात शिरून पाहणी केल्यावर सर्व सामान विखुरलेल्या अवस्थेत आढळले, ज्यावरून चोरी झाल्याची खात्री पटली.
घटनेची माहिती मिळताच खडसे यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. काही मिनिटांतच पोलिस अधिकारी आणि गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. घराचा पंचनामा सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
दरम्यान, चोरीत नेमके किती माल लंपास झाला आणि किती आर्थिक नुकसान झाले याची स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, काही मौल्यवान वस्तू आणि रोकड चोरीस गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उच्चपदस्थ राजकीय नेत्यांच्या घरावरच चोरीचा हात पडत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी विशेष पथक तयार केले असून तपास जोरात सुरू आहे.





