जळगांव जिल्हाऔद्योगिकताज्या बातम्या

जळगाव MIDC मध्ये भीषण आग; दोन कंपन्या जळून खाक

स्फोटांच्या आवाजांनी परिसर दणाणला; कोट्यवधींच्या नुकसानीची भीती

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) दि. २ मे – शहरातील औद्योगिक वसाहतीत (MIDC) शनिवारी दुपारी भीषण आगीची घटना घडून दोन नामांकित कंपन्या जळून खाक झाल्या. ‘जे’ सेक्टरमधील या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीचे रौद्र रूप इतके भीषण होते की शहराच्या विविध भागांतून धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास ‘जे ब्रदर्स’ आणि ‘श्री एंटरप्रायझेस’ या कंपन्यांना अचानक आग लागली. ‘जे ब्रदर्स’मध्ये खोबरेल व सुगंधी तेलांचे पॅकिंग केले जात होते, तर शेजारील ‘श्री एंटरप्रायझेस’मध्ये प्लास्टिकच्या चटया तयार करण्याचे काम सुरू होते. दोन्ही ठिकाणी ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले.

आग लागल्यानंतर कंपन्यांमधून स्फोटांचे मोठे आवाज ऐकू येऊ लागले. तेलाचे डबे व रसायनांच्या पिंपांमुळे हे स्फोट होत असल्याचा प्राथमिक अंदाज असून या आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाचे सहा बंब आतापर्यंत वापरण्यात आले आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेता समोरील भारत गॅस गोदामातूनही पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

या भीषण आगीत दोन्ही कंपन्यांमधील कच्चा माल, यंत्रसामग्री आणि तयार साठा जळून खाक झाला असून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार उष्णता किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button