
| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. ५ मे : शहरातील वाढत्या विजेच्या ओव्हरलोडच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी पुढाकार घेत सोमवारी (दि. ४ मे) महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शहरात प्रस्तावित असलेल्या पाच नवीन सबस्टेशन उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून, कामांना लवकरच गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बैठकीला महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन, अधिकारी अजय वाणी, देवेंद्र भंगाळे, चेतन सोनार तसेच महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे संदीप मोरे उपस्थित होते.
यावेळी शहरातील विजेच्या समस्यांचा आढावा घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
महावितरण विभागाकडून यापूर्वीच काही सबस्टेशनचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते आणि त्यांना मंजुरीही मिळाली होती. मात्र, मागील प्रशासकीय कार्यकाळात या प्रस्तावांची अंमलबजावणी झाली नसल्याने नागरिकांना विजेच्या तक्रारींना सामोरे जावे लागत होते. महावितरण आणि महानगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही कामे प्रलंबित राहिल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर महापौरांनी पुढाकार घेत सबस्टेशन उभारणीसाठी पर्यायी जागांची यादी महापालिकेकडून सादर केली आहे. या जागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पुढील दोन दिवसांत महावितरण आणि महापालिकेचे अधिकारी संयुक्त दौरा करणार आहेत. पाहणीनंतर तातडीने अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
शहरातील वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही पाच नवीन सबस्टेशन उभारणीची योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, यामुळे ओव्हरलोडची समस्या कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






