जळगांव जिल्हागुन्हे

शहराच्या मध्यवर्ती भागात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; व्यवस्थापक व दलाल ताब्यात

एलसीबी-एएचटीयूची संयुक्त कारवाई ; जळगाव शहरात खळबळ 

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. १० मे : शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या टॉवर चौक परिसरातील एका नामांकित लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

गुप्त माहितीवरून कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, टॉवर चौक परिसरातील एका लॉजमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.

‘डमी’ ग्राहकाद्वारे सापळा

कारवाईसाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीय नियोजन केले. माहितीची खात्री करण्यासाठी प्रथम एका ‘डमी’ ग्राहकाला संबंधित लॉजमध्ये पाठविण्यात आले. तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट होताच डमी ग्राहकाने इशारा दिला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या एलसीबी आणि एएचटीयूच्या पथकाने लॉजवर झडप घालत छापा टाकला.

मॅनेजर अटकेत, ग्राहकही ताब्यात

या कारवाईत लॉजचा मॅनेजर राजू मोतीराम जोशी (वय ४५, मूळ रा. राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरून उमाकांत बुधा महाजन (वय ३८, रा. भुसावळ) या ग्राहकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणाहून एका २८ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.

सखोल तपास सुरू

या सेक्स रॅकेटची पाळेमुळे आणखी कुठपर्यंत पसरली आहेत, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

कारवाईत या अधिकाऱ्यांचा सहभाग

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत Probationary DySP प्रशांत दरेकर, PSI शेखर डोमाळे, एलसीबीचे सुनील दामोदर, संदीप चव्हाण, अश्विनी सावकारे, विद्या सोनार, रूपाली खैरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, रवींद्र पाटील, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, संजय हिवरकर, सलीम शेख, हवालदार विजय पाटील, जितेंद्र पाटील, भूषण कोल्हे तसेच महिला पोलीस कर्मचारी साधना शिंदे, वहिदा तडवी आणि अर्चना कर्डेकर यांनी सहभाग घेतला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button