जळगांव जिल्हासामाजिक

अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींसोबत ‘अतूट धागा मायेचा’; रक्षाबंधनातून जपले माणुसकीचे नाते

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

| लोकमाध्यम न्युज | पाळधी/जळगाव, प्रतिनिधी : रक्षाबंधन म्हणजे भाऊ – बहिणीच्या नात्याचा उत्सवासोबत प्रेम, विश्वास, आपुलकी आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा भावनिक धागा. याच धाग्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत पाळधी येथे अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींसोबत GPS मित्र परिवाराने ‘अतूट धागा मायेचा’ हा आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा साजरा केला. राखीच्या निमित्ताने मायेच्या नात्यापासून वंचित राहू नये, या भावनेतून आयोजित या उपक्रमाने रक्षाबंधनाला माणुसकीचा नवा अर्थ दिला.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या नेतृत्वात GPS मित्र परिवाराच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरजू आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या याच सेवाभावी परंपरेतून या विशेष रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळ्यात अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींना सन्मानाने सहभागी करून घेत त्यांच्यासोबत रक्षाबंधनाचा आनंद वाटून घेण्यात आला. भगिनींनी GPS परिवारातील भावांच्या मनगटावर राखी बांधली, औक्षण केले आणि क्षणभरात रक्ताच्या नात्यापलीकडचे मायेचे नाते जुळले. भगिनींच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद आणि उपस्थितांच्या डोळ्यांत दाटलेले भाव या सोहळ्याला अधिक हृदयस्पर्शी बनवून गेले. त्यांच्या सुख-दुःखात आणि गरजेच्या प्रत्येक प्रसंगी GPS परिवार सोबत राहील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

GPS मित्र परिवाराच्या माध्यमातून आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी मदत, रक्तदान, गरजू कुटुंबांना सहाय्य, युवकांसाठी रोजगारविषयक तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याच सामाजिक जाणिवेला रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची जोड या उपक्रमातून मिळाली.

राखी मनगटावरची नव्हे, माणुसकीच्या नात्याची…

‘राखी केवळ मनगटावर बांधली जात नाही; ती माणसाला माणसाशी जोडते,’ याची जिवंत अनुभूती या सोहळ्यात आली. समाजातील विशेष गरजा असलेल्या भगिनींसोबत सणाचा आनंद वाटून घेत GPS मित्र व मैत्रीण परिवाराने राखीचा धागा माया, स्नेह, विश्वास आणि आधाराचे नाते अधिक घट्ट करणारा असल्याचा संदेश दिला. ‘सणाचा खरा आनंद आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्यात आहे,’ ही भावना अधोरेखित करणारा हा संवेदनशील उपक्रम जिल्ह्यात व उपस्थितांसाठीही अविस्मरणीय ठरला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button