चेअरमन संजय पवार, नगरसेविका वैशाली अमित पाटील, यांच्यासह इतरांचे ९ अर्ज दाखल

एकूण ५०८ अर्जाची विक्री -अर्ज दाखल करण्यास शेवटचे तीन दिवस
| लोकमाध्यम News | जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी कालपासून सुरू झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी विद्यमान चेअरमन संजय पवार, नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या सह ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महिला मतदार संघातून तीन महिलांनी, ग.स.सोसायटीतून उदय मधूकर पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. काल पहिल्याच दिवशी ९४ इच्छुकांनी ३१४ अर्ज नेले होते. आज १९४ अर्ज विक्री झाले. एकूण ५०८ अर्ज विक्री झाले आहेत.
आज बँकेचे विद्यमान चेअरमन संजय पवार (चांदसर, ता.धरणगाव) यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास संस्थेतून (धरणगाव) दोन अर्ज दाखल केले आहे.
इतर दाखल अर्ज असे – महिला प्रतिनिधी मतदार संघ- मिरा नथू पाटील, तिलोत्तमा रविंद्र पाटील, नगरसेविका वैशाली अमित पाटील, इतर मागासवर्गीय सदस्य मतदार संघ- नथू दामोदर पाटील (दोन अर्ज), ग.स.चे संचालक उदय मधूकर पाटील (दोन अर्ज).
अर्ज दाखल करण्यास शेवटचे तीन दिवस बाकी आहे. यात अजून कोण इच्छूक अर्ज दाखल करतात याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
२६ रोजी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, त्यांच्या पत्नी रजनी सावकारे, गोंडू महाजन, जनाबाई महाजन, मधुकर राणे, एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते, माजी मंत्री सतीष पाटील, अध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांनी अर्ज विकत घेतले आहेत.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर आहे. अर्ज भरण्यासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी इच्छुकांना मिळणार आहे. यामुळे ‘महायुती’सह महाविकास आघाडीच्या इच्छुकांची धावपळ उडणार आहे.
जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक २९ नोव्हेंबरला होणार आहे. ३० नोव्हेंबरला मतमोजणी होऊन नवीन संचालक मंडळ विराजमान होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळे जिल्ह्याचे उपनिबंधक मनोज चौधरी आहेत.
अर्ज माघारीसाठी १७ पर्यंत मुदत
मागील पंचवार्षिक निवडणूक २१ नोव्हेंबर २०२१ ला झाली होती. उमेदवारी अर्जांची छाननी २ नोव्हेंबरला होणार आहे. ३ नोव्हेंबरला उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. १८ नोव्हेंबरला सकाळी अकराला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप होईल.





