जळगांव जिल्हाआर्थिकगुन्हे

२३.८१ कोटींचा घोटाळा करणाऱ्या TWJ कंपनीच्या मुख्य संचालक दांपत्यास अटक; जळगाव आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. २६ : गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या TWJ असोसिएट्स प्रा. लि. कंपनीच्या मुख्य संचालकांना अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

मिलींद शालिकराव पाटील, रा. जळगाव यांनी TWJ असोसिएट्स प्रा. लि. पुणे या कंपनीच्या मुख्य संचालकांविरोधात गुंतवणूकदारांची रक्कम स्वीकारून मुदतीत परतावा न दिल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी करण्यात आली.

चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. TWJ असोसिएट्स प्रा. लि. चे मुख्य संचालक समीर नार्वेकर व नेहा नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या करारानुसार मिलींद पाटील हा जळगाव शाखेचा फ्रँचायसी म्हणून कामकाज पाहत होता. तो गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून करारनामे करून देत होता तसेच त्याला मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळाल्याचे तपासात स्पष्ट झाले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत TWJ असोसिएट्स प्रा. लि., TWJ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि. चे संचालक, एजंट आणि संबंधितांनी संगनमत करून गुंतवणूकदारांना शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष दाखवले. विविध ठिकाणी सेमिनार घेऊन “दरमहा जास्त परतावा” देण्याचे आश्वासन देण्यात आले. सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर ठेव योजना राबविण्यात आली.

या माध्यमातून तब्बल २७९ गुंतवणूकदारांकडून ११ महिन्यांच्या मुदतीसाठी एकूण २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपये जमा करण्यात आले. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना पैसे अथवा परतावा न देता विश्वासघात व फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी भरत रतीलाल पवार, रा. पाळधी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. १६५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ६१(२) तसेच “द बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स ॲक्ट २०१९” च्या कलम २१ व २३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्यात जळगाव शाखेचा ब्रँच मॅनेजर मिलींद शालिकराव पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी समीर नार्वेकर व नेहा नार्वेकर हे ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. न्यायालयाची परवानगी घेऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ मे २०२६ रोजी त्यांना ताब्यात घेतले व २६ मे २०२६ रोजी पहाटे १२.५१ वाजता अटक केली.

दोन्ही आरोपींना आज मा. सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीदरम्यान TWJ कंपनीच्या आर्थिक व्यवहारांसह मालमत्तेचा सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राज्यभरात अनेक गुन्हे दाखल

TWJ कंपनीच्या संचालकांविरोधात यवतमाळ, रत्नागिरी, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर येथेही MPID व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. श्रीनगर पोलीस ठाणे, ठाणे शहर यांनी समीर नार्वेकर व नेहा नार्वेकर यांना यापूर्वी २९ जानेवारी २०२६ रोजी अटक केली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, प्र. पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील (पो.नि.) आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश फड पोकॉ. विकास पहुरकर, घनश्याम पवार, स्मिता पाटील, विलास तायडे, रतिलाल पवार, भरत जेठवे, निलेश सुर्यवंशी, मुददसर काझी, नवल हटकर करीत आहे.

पोलिस प्रशासनाकडून आवाहन 

 TWJ असोसिएट्स प्रा. लि. जळगाव शाखेत गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीची माहिती आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे सादर करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button