जळगांव जिल्हासहकारसामाजिक

दादासाहेब जे. टी. महाजन यांनी घालून दिलेल्या विचार आणि तत्त्वांच्या पाऊलखुणांवर चालत दूध संघ अधिक भक्कमपणे उभा : ना. गुलाबराव पाटील पालकमंत्री

जळगाव जिल्हा दूध संघात दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे भावपूर्ण लोकार्पण

शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचेही उद्घाटन; दूध उत्पादकांच्या हितासाठी दूध संघाची आधुनिक वाटचाल

पालकमंत्री गुलाबराव पाटील, चेअरमन आ. मंगेश चव्हाण यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

| लोकमाध्यम न्युज | जळगाव दि . १३ : “दूध संघाचे संस्थापक चेअरमन आणि माजी गृहराज्यमंत्री कै. दादासाहेब जे. टी. महाजन यांनी घालून दिलेल्या विचारांच्या आणि तत्त्वांच्या पाऊलखुणांवर चालत आजचा दूध संघ अधिक भक्कमपणे उभा राहिला आहे. शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी या संस्थेने केलेले कार्य कौतुकास्पद असून, स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणा देत राहतील,” असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादिततर्फे १३ ऑगस्ट रोजी सकाळी दूध संघाच्या प्रांगणात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या सोहळ्यात दूध संघाचे संस्थापक चेअरमन आणि माजी गृहराज्यमंत्री कै. दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे भावपूर्ण लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी दादासाहेबांच्या कार्याला आणि शेतकरी व दूध उत्पादकांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला विनम्र अभिवादन केले.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण होते. संस्थापकांनी उभारलेल्या या संस्थेचा इतिहास, शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या जीवनाशी असलेले तिचे नाते आणि बदलत्या काळानुसार दूध संघाने स्वीकारलेले आधुनिकीकरण यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.

याच सोहळ्यात नूतनीकरण करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे तसेच मुख्य दुग्धशाळेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आधुनिकीकरण आणि वाढीव क्षमता प्रकल्पाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. शेतकरी आणि दूध उत्पादकांना आधुनिक दुग्ध व्यवसाय, पशुपालन, दूध उत्पादनातील गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि बदलत्या बाजारपेठेच्या गरजा याबाबत अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शेतकरी प्रशिक्षण केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर दुग्धशाळेतील सांडपाण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी करण्यात आलेले आधुनिकीकरण हे पर्यावरणपूरक आणि जबाबदार औद्योगिक वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.या सोहळ्यास विधान परिषदेचे आ. नंदकिशोर महाजन, आ. राजूमामा भोळे, आ. अमोल जावळे, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी आमदार रमेश चौधरी, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच दूध संघाचे संचालक मधुकर राणे, रोहित निकम, माजी आमदार दिलीप वाघ, प्रमोद पाटील, अरविंद देशमुख, डॉ. पूनम प्रशांत पाटील, छाया देवकर, पराग मोरे, ठकसेन पाटील, शामल झांबरे, स्वाती श्रीवास्तव, दगडू चौधरी, नितीन चौधरी, रावसाहेब भोसले आणि रमेश पाटील यांच्यासह दूध संघाचे सर्व सभासद व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दूध उत्पादक, शेतकरी, कर्मचारी, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण दूध संघ परिसरात उत्साहाचे आणि आपलेपणाचे वातावरण निर्माण झाले होते.

दादासाहेबांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन

प्रस्तावना करताना कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी दूध संघाचा इतिहास आणि सद्यस्थितीचा पट मांडला. दूध संघाची स्थापना, त्यानंतर झालेली वाटचाल, शेतकरी आणि दूध उत्पादकांशी संस्थेने निर्माण केलेले नाते तसेच बदलत्या काळानुसार संस्थेमध्ये करण्यात येत असलेले आधुनिकीकरण याची माहिती त्यांनी दिली. आगामी काळातही शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या सर्वांगीण विकासासाठी संघ कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी संजय हिंगणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक विभागाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नसल्याने मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले. आपल्या संदेशात त्यांनी दूध संघाचे संस्थापक चेअरमन आणि माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, दादासाहेबांनी या दूध संघाची उभारणी केवळ एक संस्था म्हणून केली नाही, तर या भागातील हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देणारा एक भक्कम आधारवड उभा केला. दादासाहेबांचा त्याग, त्यांचा संघर्ष आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा या जिल्ह्यात सर्वांनाच परिचित आहे.त्यांच्या याच उत्तुंग कार्याला विनम्र अभिवादन म्हणून दूध संघाच्या प्रांगणात त्यांचे हे भव्य स्मारक उभे राहावे, अशी माझी मनापासून संकल्पना होती. आज या स्मारकाचे लोकार्पण होत असताना दादासाहेबांच्या स्मृती आणि त्यांचे विचार आपल्या सर्वांच्या सदैव पाठीशी राहतील, हा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या कार्याचा वारसा केवळ स्मारकापुरता मर्यादित न राहता त्यांच्या विचारांमधून आणि शेतकरी व दूध उत्पादकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमधून पुढे जावा, अशी अपेक्षाही या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.

शरद महाजन यांनी व्यक्त केली कृतज्ञता

दादासाहेब जे. टी. महाजन यांचे चिरंजीव शरद महाजन यांनीही मनोगतातून दूध संघाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दादासाहेबांनी आयुष्यभर जपलेल्या मूल्यांची, शेतकरी आणि दूध उत्पादकांप्रती असलेल्या बांधिलकीची आणि दूध संघाच्या उभारणीमागील संघर्षाची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. संस्थापकांच्या स्मृतींना दूध संघाच्या प्रांगणात कायमस्वरूपी स्थान मिळणे ही संपूर्ण कुटुंबासाठी भावनिक आणि अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा दूध संघाच्या इतिहासातील सुवर्ण आणि भावूक क्षण” : पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आजचा दिवस हा जळगाव जिल्हा दूध संघाच्या इतिहासातील एक अत्यंत सुवर्ण आणि भावूक क्षण आहे. दादासाहेब जे. टी. महाजन हे केवळ या दूध संघाचे संस्थापक नव्हते, तर या भागातील हजारो शेतकरी आणि दूध उत्पादक कुटुंबांचे आधारस्तंभ होते. हे स्मारक दादासाहेबांच्या त्यागाची आणि कर्तृत्वाची आठवण करून देईल.दूध संघाने केवळ जुन्या आठवणी जपल्या नाहीत, तर काळाची गरज ओळखून नूतनीकरण केलेले शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण केले आहे, ही अतिशय अभिनंदनाची बाब आहे. शेतकऱ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यात वाढ होणे, दुग्ध व्यवसाय अधिक आधुनिक होणे आणि दूध उत्पादनाची गुणवत्ता वाढणे यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.

आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघ आधुनिकतेची नवी आव्हाने पेलत प्रगतीपथावर जात आहे. शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय समृद्ध व्हावा यासाठी राज्य शासन आणि आमचे पालकमंत्री म्हणून नेहमीच या संघाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहील, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

आम्ही दादासाहेबांच्या विचारांचे खंबीर वारसदार” : आ. मंगेशदादा चव्हाण

अध्यक्षीय मनोगतात चेअरमन आ. मंगेशदादा चव्हाण म्हणाले, संस्थापक जे. टी. महाजन यांनी जे विचार आणि संघर्षाचा मार्ग आपल्यासमोर ठेवला आहे, तोच धागा पकडून आम्ही पुढे जात आहोत. दादासाहेबांनी उभारलेली ही संस्था ही केवळ दूध संकलन आणि प्रक्रिया करणारी संस्था नसून हजारो शेतकरी व दूध उत्पादकांच्या कुटुंबांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेली संस्था आहे.आम्ही जरी दादासाहेबांचे रक्ताचे वारसदार नसलो, तरी त्यांच्या विचारांचे खंबीर वारसदार म्हणून या दूध संघाची वाटचाल यशस्वीपणे आणि पारदर्शकपणे पुढे नेत राहू, असा निर्धार चेअरमन आ. मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.संस्थापकांनी ज्या उद्देशाने दूध संघाची उभारणी केली, त्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून शेतकरी आणि दूध उत्पादकांना अधिक सक्षम करणे, संस्थेचे आधुनिकीकरण करणे, पारदर्शकता वाढवणे आणि दूध संघाला भविष्यातील आव्हानांसाठी अधिक सक्षम बनवणे यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दूध उत्पादक हा दूध संघाच्या केंद्रस्थानी असून, त्याच्या कष्टाला योग्य मोबदला, दुग्ध व्यवसायाला आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन आणि शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हीच संस्थेची खरी दिशा राहील, असा संदेशही या संपूर्ण सोहळ्यातून देण्यात आला.

शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून आधुनिक वाटचाल

दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे लोकार्पण, शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे नूतनीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाचा एकत्रित कार्यक्रम हा दूध संघाच्या परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम ठरला. एका बाजूला संस्थापकांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला भविष्यातील शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले.दूध उत्पादकांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या या संस्थेचा विकास हा अंतिमतः शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेला आहे. त्यामुळे दूध संघाच्या आगामी वाटचालीत शेतकरी आणि दूध उत्पादक हा केंद्रबिंदू राहणार असल्याचे या सोहळ्यातून स्पष्ट झाले.

सूत्रसंचालन शिवानी नेवे यांनी केले. आभार संचालक अरविंद देशमुख यांनी मानले. उपस्थित मान्यवर, दूध संघाचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, दूध उत्पादक आणि शेतकरी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. कार्यक्रमाची सांगता उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात झाली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button