जळगावमहापालिका

आयटीआय जवळील कचरा रॅम्प बंद : मेहरूण परिसरात ट्रान्सफर स्टेशनचे पालकमंत्र्यांनी केले उद्घाटन 

अग्निशमन दलातही ६ फायर दुचाकींचे लोकार्पण 

| लोकमाध्यम News | जळगाव (प्रतिनिधी) : आयटीआय परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना भेडसावणारी कचऱ्याच्या रॅम्पची गंभीर समस्या आता कायमची निकाली निघाली असून, येथील रॅम्प मेहरूण भागात टीबी सेंटर येथे स्थलांतरित झाला आहे. येथील ट्रान्सफर स्टेशनचे गुरुवारी २९ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व खा.स्मिता वाघ, आ.राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

यामुळे शहरात नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सोडवत महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांना महिन्याभरापूर्वी आंदोलनावेळी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात आणले आहे.

शहराच्या आपत्कालीन सेवेमध्येही मोलाची भर पडली आहे. आयटीआय जवळ असलेल्या कचऱ्याच्या रॅम्पमुळे तेथील विद्यार्थी आणि रहिवाशांना आरोग्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हा भाग महापौर दीपमाला काळे यांच्या वार्ड क्रमांक ७ मध्ये येत असल्याने, नागरिकांच्या तक्रारी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) आंदोलन याची त्यांनी गंभीर दखल घेतली होती.

आंदोलनावेळी महापौरांनी महिन्याभरात हा रॅम्प हलविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महापौर दीपमाला काळे यांच्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी मेहरूण परिसरातील प्रभाग समिती कार्यालय जवळील जुन्या टीबी सेंटरमध्ये ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.०’ अंतर्गत अद्ययावत ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, भाजप गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, आयुक्त आदित्य जीवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह नगरसेवक,अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले, आयटीआय जवळील कचरा रॅम्प उचलण्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांकडून सातत्याने मागण्या येत होत्या. माझ्याच वार्डात हा प्रश्न असल्याने, प्रशासनासोबत मिळून टीबी सेंटर येथे हा अद्ययावत प्रकल्प पाठपुरावा करून उभारून घेतला आहे. यामुळे आता विद्यार्थी व नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही, असे सांगितले. खा. स्मिताताई वाघ यांनी केंद्राच्या माध्यमातून जळगावच्या विकासासाठी सतत पाठपुरावा सुरू असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.

आ. राजूमामा भोळे यांनी शासनाच्या माध्यमातून महापालिकेला अधिकाधिक निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात असल्याचे सांगितले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महापालिकेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगत शहरात आणखी कचरा संकलन केंद्र उभारण्याबाबत तयारी दर्शवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी मानले.

आपत्कालीन सुरक्षेसाठी ६ अद्ययावत अग्निशमन दुचाकी वाहनांचे लोकार्पणजळगाव शहरातील वाढीव भाग आणि अरुंद गल्ल्यांमध्ये आग लागल्यासारख्या आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन दलाची मोठी वाहने जाण्यात अडथळा येत असे. यासाठी ६ अद्ययावत अग्निशमन दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे छोट्या गल्ल्यांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी तातडीने पोहोचणे शक्य होणार आहे. या दुचाकींचेही पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. या दुचाकींच्या लोकार्पणामुळे जळगावकरांच्या मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानी रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button