जळगाव दि.१० मे २०२४ : जळगांव जिल्ह्याचे लोकप्रिय नेते माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी बुधवारी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला. भविष्यात राष्ट्र, राज्य, जिल्हा व जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक भूमिकेत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सुरेशदादा जैन यांनी ही घोषणा केली.
त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त केले आहे. सुरेशदादा जैन हे १९७४ पासून राजकारणात होते. ते १९८० मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि सलग
३४ वर्षे आणि नऊ वेळा आमदार होते. ते १९८५ मध्ये तत्कालीन नगरपालिकेत पुलोदच्या माध्यमातून नगराध्यक्ष, तर १९९५ मध्ये राज्यातील शिवसेना भाजपा युती सरकारमध्ये मंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वात झालेला जळगाव शहराचा सर्वांगीण विकास, विशेषतः बीओटी तत्त्वावर बांधलेली संकुले, गोरगरिबांसाठी घरकुले आदी कामांमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभावित झाले होते.
२०१४ पासून प्रकृतीच्या कारणास्तव सुरेशदादा सक्रिय राजकारणातून बाहेर पडले होते. जळगाव जिल्ह्यातील सर्वच समाजा घटकातील नागरिक, व्यापारी व उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.गुन्हेगारी जगतातील अनेकांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना पद व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.सामान्य कार्यकर्त्याला मोठे करीत त्याला सत्तेतील मोठ मोठी पदे मिळवून दिलीत.दादांकडे गेल्या २०/२२ वर्षात प्रमुख सत्ता असती तर जळगाव शहराचा कायापालट होवून रस्ते आणि उड्डाण पुलांचे जाळे निर्माण झाले असते. मुंबई, पुणे, नासिक, सोबतच जळगाव शहराचा विकास झाला असता. अशी जनमानसांच्या भावना ऐकायला येतात. दादांच्या राजकारणातून निवृत्तीच्या घोषणेमुळे सर्व सामान्य कार्यकर्ता मात्र दुखावला आहे.