केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून पेटलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या महिन्याभरापासून नवी दिल्लीत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) आणि देशभरातील विद्यार्थ्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तीव्र मागणी केली जात होती.
या सततच्या राजकीय आणि सामाजिक दबावानंतर आज २५ जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने (ANI) प्रसिद्ध केले आहे. या घटनेमुळे महिनाभरापासून सुरू असलेल्या युवा आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. NEET परीक्षेतील गोंधळ आणि भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी आंदोलकांची होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनीही बेमुदत उपोषण सुरू केले होते. सलग उपोषण केल्यानंतर २३ जुलै रोजी वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, वांगचुक यांनी उपोषण सोडले तरीही कॉक्रोच जनता पार्टीचे समन्वयक अभिजीत दीपके आणि सहकाऱ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला होता.
या आंदोलनाला देशभरातून तरुण, विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांचा उघड पाठिंबा मिळत गेला. विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून संसद आणि संसदेबाहेर केंद्र सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवून शिक्षणमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली होती. दिल्ली पोलिसांचा हस्तक्षेप आणि इतर घडामोडींनंतरही विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम राहिले. अखेर केंद्र सरकारला या व्यापक जनक्षोभाची दखल घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांनी आज २५ जुलै रोजी आपल्या पदाचा त्याग केला. या निर्णयामुळे युवा आणि विद्यार्थी आंदोलनाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.






