जळगाव मनपाच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर उपमहापौरपदी मनोज चौधरी
नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा प्रशासनातर्फे सत्कार

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ६ फेब्रुवारी २०२६ : जळगाव शहर महानगरपालिकेच्या १७ मजलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया आज शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे, एकमेव अर्ज आलेल्या महायुतीच्या दीपमाला काळे यांची १७ व्या महापौरपदी, तर मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत या दोन्ही निवडी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्या.याप्रसंगी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव गोविंद शुक्ला आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांना प्रशासनातर्फे शुभेच्छा देण्यात येऊन सत्कार करण्यात आला .
महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर संख्याबळानुसार महापौरपद भाजपकडे आणि उपमहापौरपद शिवसेनेकडे जाणार हे निश्चित होते. दोन्ही पदांसाठी केवळ प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर आपापल्या पदावर विराजमान होताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले.

विशेष सभेसाठी महायुतीचे सर्व नगरसेवक भगवे फेटे परिधान करून उपस्थित राहिले होते, ज्यामुळे संपूर्ण सभागृह भगवेमय झाले होते. निवड जाहीर होताच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महापालिका आवारात कार्यकर्त्यांनी फुलांच्या पाकळ्यांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. जळगाव शहराच्या विकासाचा गाडा आता नव्या जोमाने पुढे नेण्याचा विश्वास यावेळी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी व्यक्त केला.






