जळगाव दि. २३ – खेळ हे ताणतणाव कमी करण्यासाठी एक उत्तम उपचार आहे. महसूल सारख्या सतत कार्यमग्न असलेल्या विभागात मानसिक आरोग्य चांगले राखणे हे एक आव्हान असते. त्यासाठी क्रीडा स्पर्धा हे एक उत्तम माध्यम आहे. यात अधिकाधिक महसूल अधिकारी,कर्मचारी यांनी सहभागी व्हावे. या स्पर्धेतून नवी ऊर्जा घ्यावी असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबरावपाटील यांनी केले.
नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुलात उदघाटन करतांना बोलत होते. यावेळी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल,जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्यासह पाचही जिल्ह्यातील महसूल अधिकारी उपस्थित होते.
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहा वर्षानंतर स्पर्धा होत आहेत. अशा स्पर्धा नियमित झाल्या पाहिजेत असे सांगून सहा वर्षानंतर स्पर्धा होत आहेत, त्या आमच्या जळगाव जिल्ह्यात होतं आहेत. जळगावच्या उन्हात स्पर्धा म्हणजे ‘उत्साहाची सावली ‘ असून ही ऊर्जा आयुष्यभर पुरणारी असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
शासनातील महसूल यंत्रणा ही सर्व यंत्रणाच्या समन्वयाचे काम करते. त्यामुळे ती मुख्य कणा आहे. शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला असला तरी महसूल कर्मचाऱ्यांना मात्र कोणत्याही आपत्ती मध्ये, कोणतेही उत्सव, महोत्सव वा आंदोलन तिथे महसूल कर्मचारी असतोच त्यामुळे महसूल मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मानसिक समाधान आवश्यक आहे. त्यासाठी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यात सहभाग घेऊन मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवा असा आरोग्यपूर्ण सल्लाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला.
आज जळगाव मध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे विभागीय महसूल आणि सांस्कृतिक स्पर्धा होत आहेत. विविध कारणामुळे मागच्या सहा वर्षात या स्पर्धा होत असून विभागात एकूण साडे सहा हजार अधिकारी,कर्मचारी आहेत. त्यातल्या दिड हजार अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. खेळ हा मानसिक संतूलनासाठी गरजेचा असल्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागवार आणि राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यासाठी मान्यता दिल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून तसेच क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आली. यावेळी विभागीय स्पर्धासाठी तयार केलेल्या स्मरणीकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर आभार नाशिक महसूल विभागाचे उपायुक्त रमेश काळे यांनी केले.