जळगावमहापालिका

वडिलांचा वारसा जपला…! जळगाव मनपाचा मोलाचा भूखंड वाचला ! ॲड. पियुष पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला जाग!

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मनपा मालकीच्या खुल्या भूखंडावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर महानगरपालिकेचा ताबा कायम राहिल्याचा दावा करण्यात आला आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारी असलेला हा भूखंड अनेक वर्षांपासून पडीत अवस्थेत असून, या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर जागा पूर्वी नर्सिंग होम कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आली होती. मात्र, दीर्घकाळ या ठिकाणी कोणतेही बांधकाम किंवा विकासकाम न झाल्याने जळगाव महानगरपालिकेने हा भूखंड पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. स्थानिक युवक या मैदानाचा खेळासाठी वापर करत होते. दरम्यान, अचानकपणे या जागेच्या संरक्षण भिंती रात्रीतून तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर ॲड. पियुष पाटील यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करून हा प्रकार “लँड माफियांचा डाव” असल्याचा आरोप केला.या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, अखेर महानगरपालिकेच्या वतीने संबंधित जागेवर मनपा ताब्याचा अधिकृत फलक लावण्यात आला. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जागेचा वापर केवळ पार्किंगसाठी करणार असल्याचे सांगितल्याचेही समोर आले. मात्र, “मनपा मालकीची जागा सर्वसामान्यांसाठी खुली राहिली पाहिजे,” अशी ठाम भूमिका ॲड. पाटील यांनी घेतल्याचे सांगण्यात आले.

रात्रीतून संरक्षण भिंती तोडल्याचा आरोप

सदर जागा इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लगत असल्याने पार्किंगसाठी ती उपयोगात आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी रात्रीतून संरक्षण भिंती तोडून जेसीबीच्या साहाय्याने जागेत प्रवेश करण्यात आल्याचे ॲड. पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्येही संताप व्यक्त करण्यात आला.

दहा वर्षांपूर्वीही झाला होता कब्जाचा प्रयत्न

या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नावाचे गेट रात्रीतून उभारण्यात आले होते तसेच मनपा मालकीचा फलक हटविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुरवाडे आदींनी आवाज उठवल्यानंतर हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता.

विनापरवानगी बांधकामाचा आरोप

दरम्यान, या जागेवर आवश्यक मंजुरी, इस्टिमेट आणि एनओसी न घेता संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बी.जे. मार्केटकडील संरक्षण भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲड. पियुष पाटील यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मनपाचे हित जपण्याची परंपरा कायम

यावेळी बोलताना ॲड. पियुष पाटील यांनी त्यांच्या वडिलांचे, माजी नगरसेवक स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांचे उदाहरण देत मनपा मालमत्ता वाचविण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे सांगितले. गणेशवाडी येथील बगीचा तसेच शहर पोलीस स्टेशनलगतची पार्किंग जागा न्यायालयीन लढ्यांतून वाचवण्यात स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

मनपा प्रशासनासमोर युक्तिवाद

जागेचे सपाटीकरण आणि ताबा प्रक्रिया सुरू असताना काही डॉक्टरांनी ही जागा न्यायालयीन वादात असल्याचे सांगत कामकाज थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी नगररचना विभागाचे अध्यक्ष अमोल पाटील, अभियंता विजय मराठे तसेच प्रभाग अभियंता पुराणिक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, आवश्यक कागदपत्र तत्काळ उपलब्ध नसल्याने परिस्थिती संभ्रमाची झाली होती. अशावेळी ॲड. पियुष पाटील यांनी स्वतःकडे सर्व कागदपत्रे असल्याचा दावा करत जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर संबंधित जागेवर महानगरपालिकेचा ताबा कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button