लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.१७ जुलै २०२४ |पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंच मंडळातर्फे आषाढी एकादशीनिमित्त बुधवार, 17 जुलै रोजी विठ्ठल रुखमाईचा रथ काढण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता पिंप्राळा येथील गांधी चौकात सत्कार समारंभ होईल. दुपारी बारा वाजता जुन्या ग्रामपंचायतीपासून रथोत्सवास सुरवात होईल.
रथ मार्गावर मनपाकडून विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. विविध ठिकाणी अतिरिक्त हॅलोजन लाईट लावण्यात आले आहेत. आरोग्य विभागातर्फे रथ मार्गावर स्वच्छता करण्यात आली आहे.
यांची असेल उपस्थिती
या रथोत्सवास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलिस अधीक्षक संदीप गावित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित राहतील.
रथ मार्गात अडचण ठरणारे विजेचे पोल वीज वितरण कंपनीकडून हलविण्यता आले आहेत. तर रथांच्या कळसाला वीजेच्या तारांचा स्पर्श होऊ नये म्हणून वीज तारा उंच घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे बांबूच्या मदतीने वीज तारा वर करण्याची गरज भासणार नाही.
असे होतील कार्यक्रम
आषाढी एकादशीस सकाळी पाच वाजेला अक्ष्ाय वाणी हे सपत्नीक महाअभिषेक करतील. नंतर त्याची महापूजा सकाळी साडेअकरा वाजता कुलदीप पंडित यांच्या हस्ते होईल. दुपारी बारा वाजताची महाआरती मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मीता वाघ, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते होईल. त्यानंतर रथोत्सवास सुरवात होईल.
असा आहे रथाचा मार्ग
जुन्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयापासून रथास सुरवात होईल. तेथून कुंभार वाडा, भिलवाडा, धनगरवाडा, पिंप्राळा रिक्ष्ाा स्टॉप, गांधी चौक, मारोती मंदिर परत जुने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन समारोप होईल, असे मंदिराचे अध्यक्ष मोहनदास वाणी यांनी कळविले आहे.