
लोकमाध्यम न्युज जळगांव १९ : येथील गुजराल पेट्रोल पंपा समोरील ओम शांतीनगर येथे ओम शांती सांस्कृतिक क्रीडा व शैक्षणिक संस्कार मंडळ तसेच ओम शिव शंकर मंदिर प्रांगणामध्ये स्व. प्रा.पी व्ही कोळी सर, स्व. कुसुमबाई कोळी आणि स्व. जयश्री कोळी यांचे पुण्यस्मरणार्थ दिनांक ११ ते १७ मे पर्यंत श्रीमद् भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
संगीतमय भव्य श्रीमद् भागवत कथेची सांगता रविवार १८ रोजी सकाळी शोभायात्रेने व ह. भ. प. देवदत्त महाराज यांच्या गोपाळकाल्याच्या कीर्तनाने झाली.
ग्रंथाच्या शोभायात्रेत असंख्य भाविकांची पारंपारिक वेशात
उपस्थिती होती. तसेच कलशधारी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती, द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून गोपाळकाला केला. कुशल नेतृत्व आणि कर्तृत्व हे भगवंताच्या अवतार कार्याचे विशेषत्व आहे म्हणूनच ते आपल्या गोपालांमध्ये रमतात. गोपाळकाला म्हणजे गोपाळांनी आणलेल्या शिदोऱ्या एकत्र करणं आणि वाटण त्याच प्रमाणे देवाच्या भक्तांनी सोबत राहून आपले विचार एकत्र करावेत आणि त्यातूनच राष्ट्रहित समाजहित साधावे हाच खरा अध्यात्मिक गोपाळकाला आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे ! आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी !! ह्या अभंगातून निरूपण करून ह भ प देवदत्त महाराज यांनी गोपाळकाल्याचे महत्त्व कीर्तनातून सांगितले. किर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली व त्याचा प्रसाद एकत्र करून भाविकांना देण्यात आला. प्रसाद मिळाल्यावर भाविकांनी गोपाळकाला गोड झाला,गोपाळांनी गोड केला असा जयघोष केला.कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक भूषणकुमार सूर्यवंशी तसेच नियोजक शांताराम पाटील सर, ह भ प गोकुळ महाराज यांच्या सह परिसरातील समस्त भाविकांचे सहकार्य मिळाले.