क्राईमजळगांव जिल्हा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह इतर दोन पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या !

रोकडसह मोठा शस्त्रसाठा आरोपींकडून जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १५ ऑक्टोंबर २०२५  मुक्ताईनगर | प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा अखेर जळगाव गुन्हे शाखेने चार दिवसांच्या अतिशय काटेकोर तपासानंतर पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात भुसावळ आणि अकोला तालुक्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मुक्ताईनगर येथील रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला होता. त्यानंतर या दरोडेखोरांनी सलग कर्की फाटा (ता. मुक्ताईनगर) येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील सैय्यद पेट्रोल पंप यांनाही लुटले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डीव्हीआर चोरला आणि तब्बल एक लाख ३३ हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झाले.

अटक झालेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

सचिन अरविंद भालेराव (३५, भुसावळ, मूळ रा. खकनार, जि. बुर्‍हाणपूर, म.प्र.), पंकज मोहन गायकवाड (२३, वेडीमाता मंदिर, जुना सातारा रोड, भुसावळ), हर्षल अनिल बावस्कर (२१, बाळापूर, जि. अकोला), देवेंद्र अनिल बावस्कर (२३, बाळापूर, जि. अकोला) आणि प्रदुम्न दिनेश विरघट (१९, श्रद्धा नगर, कौलखेड, अकोला).

मोठा शस्त्रसाठा आणि रोख जप्त:

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ४० हजार रुपयांची रोकड, तीन गावठी पिस्तुले, पाच मॅगझिन, नऊ मोबाईल फोन आणि एक निळ्या रंगाची सॅक बॅग जप्त केली आहे.

गुन्हे शाखेचा सखोल तपास

जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि भुसावळचे उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे व ग्रेडेड पीएसआय रवी नरवाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांनी चार आरोपींना नाशिकहून तर एक आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार अकोल्यातून अटक केला.

मुख्य आरोपीवर आधीच गुन्हे नोंद:

अटकेतील मुख्य आरोपी सचिन भालेराव याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि दंगा करणे या दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच, २०२४ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार त्याला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.

या धाडसी कारवाईमुळे मुक्ताईनगर, भुसावळ व परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button